
इस्लामाबाद, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात मंगळवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पोलिओ लसीकरण पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) रझा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिओ लसीकरण पथकाला सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांचे एक पथक याख डांड गावाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मोहमंद जिल्ह्यातील पिंडियाली तहसीलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर दबा धरून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला आणि मृत पोलिसांचे मृतदेह घलनई येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
प्रांतात घडलेल्या आणखी एका घटनेत मंगळवारी टांक जिल्ह्यातून अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी चार पोलिओ कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. स्थानिक पोलीस अधिकारी अब्दुल समद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून अज्ञात ठिकाणी नेले.अपहरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांनी आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, यापूर्वी प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांकडून पोलिओ लसीकरण पथकांना लक्ष्य करण्यात आले आहे.२७ जिल्ह्यांमधील ४८ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चार दिवसीय मोहिमेच्या पहिल्याच दिवशी हा हल्ला झाला. या मोहिमेसाठी २० हजार ७७२ पथके तैनात करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे ३० हजार सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.खैबर पख्तूनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी दोन्ही घटनांचा तीव्र निषेध केला असून, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच अपहरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी खैबर जिल्ह्यात पोलिओचा आणखी एक नवीन रुग्ण आढळला होता. त्यामुळे यंदा पाकिस्तानमध्ये पोलिओच्या रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे.दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलच्या आकडेवारीनुसार, २०२० पासून आतापर्यंत या प्रांतात पोलिओ लसीकरण पथकांवर किमान ४७ हल्ले झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जगातील असे केवळ दोन देश आहेत, जिथे अद्याप पोलिओचे संक्रमण पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode