
वॉशिंग्टन, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला असून मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी अमेरिकेने इराणवर पुन्हा मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या क्यूशम बेटावर गुप्तपणे हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर बेटावर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही क्यूशम बेटावर अनेक स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीनंतर इराणविरोधात नव्याने लष्करी कारवाई सुरू करण्याची विनंती केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई समोर आली आहे.
वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चेवरून पुन्हा एकदा तणाव वाढला असून लष्करी कारवाया नव्याने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वारावर आणि पर्शियन आखातात असलेल्या क्यूशम बेटावर हल्ले करून तणावात आणखी भर घातली आहे.अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार,अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या काही ठिकाणांवर संरक्षणात्मक हल्ले केले आहेत.व्यापक लष्करी संघर्षाचे संकेत जाऊ नयेत, यासाठी हे हल्ले अत्यंत गुप्तपणे आणि मर्यादित स्वरूपात करण्यात आले. या कारवाईदरम्यान बेटावर अनेक जोरदार स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
इराणची सरकारी वृत्तसंस्थानुसार, अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील क्यूशम बेटावर अनेक मोठे स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आले. वृत्तानुसार, ही कारवाई गेल्या काही आठवड्यांपासून वॉशिंग्टनकडून सुरू असलेल्या मर्यादित लष्करी मोहिमेचाच एक भाग होती. अमेरिकेने या हल्ल्यांचे स्वरूप अत्यंत गोपनीय आणि मर्यादित ठेवले होते. इराणविरोधात पुन्हा व्यापक लष्करी मोहीम सुरू करण्याची अमेरिकेची योजना असल्याचा संदेश जाऊ नये, हा त्यामागील उद्देश होता.
दरम्यान, आज अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मंगळवारी होणाऱ्या या निवडणुकीनंतर इराणविरोधात नव्याने लष्करी कारवाई करण्याचा विचार करावा, अशी विनंती नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना केली होती. मात्र, अमेरिकेने मतदानाच्या अगदी आधीच ही कारवाई केली आहे. वृत्तानुसार, शनिवारी ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात सुरू असलेल्या संपर्कासह पुन्हा लष्करी मोहीम सुरू करण्याच्या शक्यतेवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे, अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमधील तणाव अत्यंत वाढलेला असतानाही वॉशिंग्टन आणि तेहरान राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत.दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर हल्ला करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्टपणे ‘नाही’ असे उत्तर दिले होते. मात्र, ट्रम्प यांनी हल्ला करणार नसल्याचे सांगूनही अमेरिकेकडून ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode