
तेहरान, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।इराणमध्ये अण्वस्त्र हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे अमेरिका तेहरानवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सूचनांकडे इराणमधील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे संकेत म्हणूनही पाहिले जात आहे. तसेच, इराण प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली जात असल्याचे मानले जात आहे.
वृत्तांनुसार, सरकारी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि प्रसारमाध्यमांचे गट नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातील एक व्हिडिओ सातत्याने प्रसारित करत आहेत. या व्हिडिओमध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.या सूचनांनुसार, स्फोटाच्या वेळी निर्माण होणाऱ्या प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. तुम्ही घराबाहेर असाल आणि तातडीने एखाद्या इमारतीत प्रवेश करणे शक्य नसेल, तर कोणत्याही आडोशामागे लपावे. जमिनीवर झोपून डोके आणि चेहरा झाकून घ्यावा. स्फोटाची लाट ओसरल्यानंतर जवळच्या इमारतीत प्रवेश करावा. स्फोट पाहण्यासाठी किंवा त्याचे छायाचित्र काढण्यासाठी थांबू नये. तसेच, कारमध्ये जाऊन लपण्याचा प्रयत्न करू नये.
इमारतीच्या आत गेल्यानंतर खिडक्या आणि बाहेरील भिंतींपासून दूर राहावे. शक्य असल्यास तळघरात किंवा इमारतीच्या मध्यवर्ती भागात आश्रय घ्यावा. दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात. बाहेरील हवा आत खेचणारे वातानुकूलन यंत्र किंवा अन्य वायुवीजन यंत्रणा बंद करावी.याशिवाय, किरणोत्सर्गी पदार्थांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्यास बाहेरील कपडे अंगावरून काढावेत. मात्र, कपडे झटकू नयेत. ते इतर व्यक्तींपासून दूर असलेल्या बंद पिशवीत ठेवावेत. ते फेकण्यासाठी बाहेर जाऊ नये. कोमट पाणी आणि साबणाने शरीर स्वच्छ धुवावे. कंडिशनरचा वापर न करता नियमित शाम्पूने केस धुवावेत. अंघोळ करणे शक्य नसल्यास चेहरा, हात आणि उघडी त्वचा पाण्याने किंवा ओल्या वाइप्सने स्वच्छ करावी.
नागरिकांनी पिण्यासाठी बाटलीबंद पाणी आणि खाण्यासाठी पॅकबंद अन्नाचा वापर करावा. किमान २४ तास सुरक्षित आश्रयस्थानी राहण्याची तयारी ठेवावी. २४ तासांनंतरही परिसर सुरक्षित झाला आहे, असे गृहीत धरू नये. सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी प्रशासनाच्या अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन सूचनांचे पालन करावे. इमारतीला आग लागल्यास किंवा ती कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना या सूचनांची आधीच माहिती देऊन त्यानुसार तयारी करून ठेवावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode