
कीव, 03 नोव्हेंबर (हिं.स.)।युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातील एका गावात असलेल्या शाळेवर रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बचाव पथकातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, या शाळेचा वापर मदत साहित्याच्या वितरण केंद्रासाठी केला जात होता. तसेच, अनेक नागरिकांनी या शाळेत आश्रय घेतला होता. शाळेच्या इमारतीवर पहिला हवाई हल्ला झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा हल्ला करण्यात आल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.झापोरिझिया शहर परिषदेच्या सचिव रेझिना खारचेन्को यांनी हल्ल्यानंतर २७ जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आणखी एका घडामोडीत सोमवारी रशिया आणि युक्रेनमधील मोबाईल अॅप्सवर सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने रशियावर आपल्या आपत्कालीन इशारा देणाऱ्या अॅपमध्ये हॅकिंग केल्याचा आरोप केला आहे. या हॅकिंगमुळे युक्रेनमधील नागरिकांच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अणुहल्ला तसेच रासायनिक हल्ल्यांचे इशारे मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडणे टाळत आहेत.दरम्यान, रशियानेही आपल्या देशातील मोबाईल अॅप्सवर सायबर हल्ले झाल्याचे म्हटले आहे. युक्रेनमध्ये हे खोटे इशारे ओलेश्की आणि आसपासच्या परिसरातील सहा दिवसांचा युद्धविराम संपल्यानंतर मिळू लागले होते.
युक्रेनच्या नागरिकांना मिळालेल्या एका इशाऱ्यात रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ‘ओरेश्निक’मध्ये अणुबॉम्ब बसवून ते डागल्याचा दावा करण्यात आला होता. या संदेशामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये भीती पसरली आणि प्रत्येक जण सुरक्षित ठिकाण शोधू लागला.मात्र, काही वेळातच युक्रेनच्या हवाई दलाच्या लक्षात आले की, देशाची आपत्कालीन इशारा प्रणाली हॅक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रणालीशी संबंधित टेलिग्राम मेसेजिंग चॅटवरून खोटे इशारे पाठवले जात होते. इशारे देणारे संदेश रशियन भाषेत प्रसारित होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हवाई दलाला सायबर हल्ल्याचा संशय आला.
काही तासांनंतर रशियाची सरकारी वृत्तसंस्थाने देशाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या हवाल्याने रशियन मोबाईल अॅप्सवर सायबर हल्ला झाल्याचे वृत्त दिले. या हल्ल्यामुळे नागरिकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचत असल्याचे मंत्रालयाने सांगितले.या सायबर हल्ल्याची जबाबदारी युक्रेनसमर्थक हॅकिंग गट ‘आतेश’ने स्वीकारली आहे. दरम्यान, रशियन सरकारने नागरिकांना शांत राहण्याचे आणि आपली दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode