मद्यधुंद पोलीस अंमलदाराचा पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
पुणे, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न एका पोलीस अंमलदाराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगल्यावरील सुरक्षारक्षकांच्या अंगावर कार घालून त्यांच्या ह
CP Pune


पुणे, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। मद्याच्या नशेत भरधाव कार चालवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न एका पोलीस अंमलदाराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगल्यावरील सुरक्षारक्षकांच्या अंगावर कार घालून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित अंमलदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अमोल वसंतराव भिसे (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. तो सध्या पुणे पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरातील पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी घडला.

या घटनेबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. अमोल भिसे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संबंधित पोलीस अंमलदाराची सध्या पोलीस मुख्यालयात नेमणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande