
सोलापूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील इचगाव टोलनाक्यावर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत मद्याची वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडण्यात आले असून, विदेशी मद्याच्या बाटल्या, बिअर आणि वाहनासह एकूण ३० लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गोवा बनावटीचे मद्य घेऊन एक चारचाकी वाहन सोलापूर-मंगळवेढा मार्गावरून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने इचगाव टोलनाक्यावर वाहन अडवून तपासणी केली. या तपासणीत वाहनामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले.
या कारवाईत २३८ बॉक्समधील ७५० मिली आणि १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्याच्या एकूण ३ हजार ८८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच बिअरच्या २६४ बाटल्या, २ हजार ६८ बल्क लिटर विदेशी मद्य, १३३ बल्क लिटर बिअर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण ३० लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड