लातूर - दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात १८ नोव्हेंबर रोजी ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे भव्य आध्यात्मिक प्रवचन
लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। जागतिक कीर्तीच्या आध्यात्मिक मार्गदर्शिका, प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या विशेष आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाचे लातूरमध्ये भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या महासोहळ्याच्या नियोजनासाठी आणि
अध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन


लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। जागतिक कीर्तीच्या आध्यात्मिक मार्गदर्शिका, प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या विशेष आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाचे लातूरमध्ये भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या महासोहळ्याच्या नियोजनासाठी आणि पूर्वतयारीसाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव श्री. रमेश बियाणी, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड, लातूर ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा दीदी तसेच उपसंचालिका ब्रह्माकुमारी पुण्या दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी यांनी लातूर ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका, उपसंचालिका व त्यांच्या संपूर्ण टीमला आश्वस्त केले की, हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत पार पडेल तथा उपस्थित सर्व प्रेक्षकांना जीवनाकडे पाहण्याची उत्तम प्रेरणा देणारा ठरेल. तसेच, संस्थेचे सचिव श्री. रमेश बियाणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा कार्यक्रम केवळ लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्मरणात राहील. प्रवचनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथे पूर्ण सन्मान दिला जाईल आणि प्रत्येक माणूस आमच्यासाठी प्रमुख अतिथीच असेल. याप्रसंगी त्यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कार्यक्रमाची अचूक व नेमकी तयारी करण्याबाबतच्या सर्व आवश्यक सूचना दिल्या.

दिव्य ऊर्जा आणि आध्यात्मिक चिंतनाचा एक अद्वितीय संगम साधण्याची ही सुवर्णसंधी लातूरकरांना १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत दयानंद शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर लाभणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात 'रिचार्ज युवर लाईफ' या प्रेरणादायी विषयावर ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे आध्यात्मिक प्रवचन होणार आहे. या सोहळ्याला सुमारे ६,००० ते १२,००० प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती लाभण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची प्रवेशपत्रिका, ऑनलाईन नोंदणी व्यवस्था, भव्य मंडप उभारणी, आसनव्यवस्था, तसेच सुरक्षा व वाहतूक नियंत्रण या सर्व बाबींच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वागत समिती, मंच व्यवस्थापन, पाणी व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्था समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या बैठकीला लातूर ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे ब्रह्माकुमार रवी हिंगणे, ब्रह्माकुमार योगेंद्र हिंगणे, ब्रह्माकुमारी प्रेरणा रेड्डी यांच्यासह, ब्रह्माकुमार आबा रेड्डी, ब्रह्माकुमार डॉ. किशोर वाघन्ना दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. पुनम नथानी यांनी मानले. या अभूतपूर्व आध्यात्मिक प्रवचनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी आणि सचिव श्री. रमेश बियाणी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande