
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)विधी सेवा प्राधिकरणातर्फे बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी देशभरात ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील 50 हून अधिक शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले.
शहरात १० शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. तसेच, जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये तालुका विधी सेवा समित्यांच्या माध्यमातून संबंधित तालुक्यांतील न्यायिक अधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे घेतले. यात बालकांना त्यांचे मूलभूत हक्क, वैयक्तिक सुरक्षितता, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर सुरक्षितता आणि बालशोषणापासून संरक्षण याबाबत जागरूकता करण्यात आली. शाळांमध्ये मार्गदर्शन सत्रे, संवादात्मक कार्यक्रम आणि व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यात बालकांचे हक्क व पास्को अधिनियम, बालकांची वैयक्तिक व डिजिटल सुरक्षितता, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, बालविवाह व बालशोषण प्रतिबंध तसेच बालकांचे सक्षमीकरण, आपत्कालीन मदत आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या बालस्नेही विधी सेवा योजनाबाबत माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा शोषण झाल्यास घाबरून न जाता विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. अभियानासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा उज्वला नंदेश्वर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे आणि शासकीय विभागांनी सहभाग घेतला. परीक्षांच्या कालावधीमुळे हा कार्यक्रम आता दि. २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी