अमरावती : गुरुकुंज मोझरीच्या यात्रेत वडा-पावच्या गाडीला आग; कोणतीही जीवितहानी नाही
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे लागलेल्या नाश्त्याच्या गाडीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मारुती व्हॅन जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेत को
गुरुकुंज मोझरीच्या यात्रेत वडा-पावच्या गाडीला आग


अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे लागलेल्या नाश्त्याच्या गाडीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मारुती व्हॅन जळून खाक झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गुरुकुंज मोझरी येथे ३० ऑक्टोबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसह यात्रेची मोठी रेलचेल सुरू आहे. यात्रेत भाविक आणि नागरिकांची मोठी गर्दी होत असून, खाद्यपदार्थांची दुकाने, विविध स्टॉल आणि व्यावसायिकांनी परिसरात आपली दुकाने थाटली आहेत. प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील खरी धानोरा येथील वंदना सुधीर गवई यांच्या मालकीची मारुती व्हॅन (वाहन क्रमांक एमएच २९ एन ९२७८) वडा-पाव, फिंगर विक्रीची गाडी उभी होती. सोमवारी रात्री यात्रेतील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक या गाडीला आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वाळांनी संपूर्ण गाडीला आपल्या विळख्यात घेतले आणि पाहता पाहता गाडी जळून खाक झाली. तिवसा पोलीसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे वैभव बोकडे, विजय यावले, अंकित माहोरे, राहुल आसोडे यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. मात्र, तोपर्यंत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

-----------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande