अमरावती मनपाच्या लेखा विभागात मनुष्यबळाचा दुष्काळ; दिवाळीपूर्वी देणी मिळण्याची प्रतीक्षा
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अमरावती महानगरपालिकेच्या लेखा विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आधीच कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या या विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमु
मनपाच्या लेखा विभागात मनुष्यबळाचा दुष्काळ दिवाळीपूर्वी देणी मिळण्याची प्रतीक्षा


अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अमरावती महानगरपालिकेच्या लेखा विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आधीच कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या या विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण कारभारच विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. वेतन, धनादेश आणि विविध देयकांच्या प्रतीक्षेत मनपा कर्मचारी, कंत्राटदार व पुरवठादार लेखा विभागाचे उंबरठे झिजवत असून, दिवाळीपूर्वी पैसे मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांचा कणा असलेल्या लेखा विभागात धनादेश तयार करणे आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित महत्त्वाची कामे आशेष सातोकर व अजय चव्हाण हे दोन अनुभवी कर्मचारी अनेक वर्षांपासून सांभाळत होते. कर्मचाऱ्यांचे वेतन असो अथवा कंत्राटदारांची देयके, आर्थिक व्यवहारांची जबाबदारी ते पार पाडत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या जागी जबाबदारी स्वीकारण्यासाठी कर्मचारी पुढे येत नसल्याचे समजते. एखादी चूकदेखील मोठ्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा जोखमीच्या कामाची जबाबदारी स्वीकारण्यासकर्मचारी धजावत नसल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या आर्थिक कामकाजावरही परिणाम

लेखा विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचाही कामकाजावर परिणाम झाला आहे. कुणाल बांबल यांच्याकडे टीडीएस, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेचा ताळमेळ तसेच शासनाच्या विविध ऑनलाइन आयकरविषयक कामकाजाची जबाबदारी होती. तर गणेश मेश्राम हे डीसीपीएस आणि एनपीएससंबंधित कामकाज पाहत होते. या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे विभागातील कामाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande