नवी दिल्ली : प्रशांत भूषण यांच्याविरोधात एफआयआर
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचा छेडछाड करून तयार केलेला कथित बनावट व्हिडिओ
प्रशांत भूषण


रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचा छेडछाड करून तयार केलेला कथित बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी सायबर पेट्रोलिंगदरम्यान हा प्रकार समोर आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 263/26 नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सूत्रांच्या दाव्यानुसार, संबंधित व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारा, बदनामीकारक आणि चिथावणीखोर मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची तसेच समाजात अफवा पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

भारतीय न्याय संहितेचे कलम 336 (4) प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार करण्याशी संबंधित आहे. कलम 353 (1)(सी) खोटी माहिती किंवा अफवांच्या माध्यमातून विविध समाजघटकांमध्ये गुन्हेगारी कृत्यांना चिथावणी देण्यासंदर्भात आहे. कलम 356 मानहानीशी, तर कलम 340 (2) बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदी अस्सल असल्याचे भासवून वापरण्याशी संबंधित आहे.दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 सी दुसऱ्या व्यक्तीची डिजिटल स्वाक्षरी, पासवर्ड किंवा विशिष्ट डिजिटल ओळख फसवणुकीने वापरण्याशी संबंधित आहे.या प्रकरणातील सर्व पैलूंचा दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित व्हिडिओची सत्यता, त्याचा प्रसार आणि त्यामागील उद्देश यांची चौकशी केली जात आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande