
देशातील 88 संभागांमध्ये संघाची संघटनात्मक पुनर्रचना होणार
इंदूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात केलेल्या संघटनात्मक विस्तारानंतर आता सामाजिक क्षेत्रातील उपक्रम अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू केली आहे. सामाजिक समरसता, तरुणांना विधायक उपक्रमांशी जोडणे, व्यसनमुक्ती अभियान आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढवणे यांना संघाच्या आगामी कार्ययोजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी बुधवारी मध्यप्रदेशच्या इंदुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इंदूरच्या डेली कॉलेज परिसरात 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. याप्रसंगी संवाद साधतांना होसबळे म्हणाले की, संघ आता सामाजिक समरसता, युवा आणि व्यसनमुक्तीवर भर
देणार आहे. यासोबतच संघटनेचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी सध्याच्या ४६ प्रांतांच्या व्यवस्थेऐवजी देशभरात ८८ संभागांमध्ये संघटनात्मक पुनर्रचना करण्यात येणार आहे.
एका वर्षात १०,२४१ नवीन ठिकाणी संघाचा विस्तार
होसबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संघाने १०,२४१ नवीन ठिकाणी आपला विस्तार केला आहे.सध्या देशभरातील ६३,२०८ ठिकाणी संघाच्या ९९,४२३ दैनंदिन शाखा सुरू आहेत. याशिवाय ३४,९८२ साप्ताहिक मिलन आणि १४,०९६ मासिक मंडळांच्या माध्यमातून संघाचे कार्य सुरू आहे. अशा प्रकारे संघाच्या विविध उपक्रमांचा विस्तार एकूण १,०३,३९७ ठिकाणांपर्यंत पोहोचला आहे.शताब्दी वर्षानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ६५,६६४ हिंदू संमेलनांमध्ये सुमारे ४.९४ कोटी नागरिकांनी सहभाग घेतला. तर गृहसंपर्क अभियानाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी देशभरातील १०.२२ कोटींहून अधिक घरांपर्यंत संपर्क साधला. आता या संपर्काचे रूपांतर नियमित सामाजिक संवादात करण्यावर संघाचा भर राहणार आहे.
आरक्षणाबाबत संघाची भूमिका स्पष्ट
सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दत्तात्रेय होसबाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ऐतिहासिक आणि सामाजिक भेदभावामुळे असमानतेचा सामना करणाऱ्या मागासवर्गीय घटकांना जोपर्यंत समानतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही, तोपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.तसेच आरक्षणाचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याचीही खात्री करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्तीसाठी सामाजिक संघटनांची मदत घेणार
तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त करताना होसबाळे यांनी या समस्येवर मात करण्यासाठी सरकारसोबत सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनीही एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांचे पुनर्वसन, त्यांना मानसिक समुपदेशन उपलब्ध करून देणे आणि सकारात्मक व विधायक उपक्रमांशी जोडणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.शताब्दी वर्षात ३५ वर्षांखालील तरुणांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ३८ लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांचे मदतकार्य
बैठकीत नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांनी केलेल्या सेवाकार्यांचाही आढावा घेण्यात आला. आसाम, नागालँड, चित्रकूट, लखनऊ तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये पूर, अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांपर्यंत मदतसाहित्य पोहोचवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
डिजिटल माध्यमांच्या प्रभावाबाबत चिंता
डिजिटल प्लॅटफॉर्मचा लहान मुले आणि तरुणांवर होणारा परिणाम हा देखील बैठकीतील चर्चेचा महत्त्वाचा विषय होता. या पार्श्वभूमीवर कुटुंबांमध्ये संवाद वाढवणे, संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज होसबाळे यांनी व्यक्त केली.एकूणच, शताब्दी वर्षात झालेला संघटनात्मक विस्तार आता सामाजिक समरसता, सेवा उपक्रम, व्यसनमुक्ती, युवा सहभाग आणि जनसंपर्काच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
-----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी