
तब्बल ९४ वर्षांनंतर रिपब्लिकन वर्चस्वाला धक्का
ऍडम हॅमिल्टन यांनी सिनेटर रॉजर मार्शल यांचा केला पराभव
ट्रम्प यांच्या धोरणांविरोधातील नाराजीचा निवडणुकीत परिणाम
वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये कॅन्सस राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. रिपब्लिकन पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कॅन्ससमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अॅडम हॅमिल्टन यांनी विद्यमान रिपब्लिकन सिनेटर रॉजर मार्शल यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे तब्बल ९४ वर्षांनंतर कॅन्ससच्या मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला अमेरिकेच्या सिनेटवर पाठवले आहे.
अमेरिकेच्या राजकारणात या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १९३२ मध्ये जॉर्ज मॅकगिल यांच्यानंतर कॅन्ससमधून एकाही डेमोक्रॅटिक उमेदवाराला सिनेट निवडणुकीत विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे हॅमिल्टन यांचा विजय हा केवळ एका जागेवरील सत्तांतर नसून राज्यातील दीर्घकालीन राजकीय समीकरणांना बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालामागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविषयी मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. वाढता जीवनावश्यक खर्च, आयात शुल्कविषयक धोरणे, अर्थव्यवस्थेबाबतची चिंता आणि इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेला आर्थिक तणाव हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. हॅमिल्टन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर टीका करताना वाढत्या खर्चाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद लावली होती. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, या सिनेट निवडणूक लढतीवर सुमारे ११० दशलक्ष डॉलर म्हणजेच ११ कोटी डॉलर खर्च झाले. कॅन्ससच्या निवडणूक इतिहासातील हा विक्रमी खर्च मानला जात आहे. रॉजर मार्शल यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने जोरदार प्रचार केला. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑक्टोबरमध्ये कॅन्ससमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या, तर उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही राज्यात प्रचार दौरे केले. मात्र, या प्रयत्नांचा निवडणुकीत अपेक्षित फायदा रिपब्लिकन पक्षाला झाला नाही.
दुसरीकडे, हॅमिल्टन यांनी प्रचारादरम्यान केवळ पारंपरिक डेमोक्रॅटिक मतदारांवर अवलंबून न राहता अपक्ष आणि मध्यममार्गी रिपब्लिकन मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वतंत्र विचारसरणीचे आणि सर्वसमावेशक नेतृत्व देऊ शकणारे उमेदवार अशी तयार केली. वॉशिंग्टनमधील वाढती राजकीय गटबाजी संपवून दोन्ही पक्षांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
हॅमिल्टन हे धर्मगुरू असून त्यांनी कॅन्सस परिसरातील मोठ्या युनायटेड मेथोडिस्ट चर्चचे नेतृत्व केले आहे. प्रचारात त्यांनी धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा उपयोग करत सामान्य नागरिकांच्या आर्थिक प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यामुळे पारंपरिक रिपब्लिकन मतदारांमध्येही त्यांना पाठिंबा मिळाल्याचे मानले जात आहे.
कॅन्ससमधील हा निकाल अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. रिपब्लिकन पक्षाच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेवर डेमोक्रॅटिक पक्षाने मिळवलेला विजय सिनेटमधील सत्तासमीकरणांवर परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे, २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी कॅन्ससमध्ये १६ टक्क्यांहून अधिक मताधिक्य मिळवले होते. अशा राज्यात डेमोक्रॅटिक उमेदवाराचा विजय हा मतदारांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा महत्त्वपूर्ण संकेत मानला जात आहे.
एकूणच, कॅन्ससमधील हा विजय डेमोक्रॅटिक पक्षासाठी नवसंजीवनी देणारा ठरला असून, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला आगामी राजकीय वाटचालीसाठी आत्मपरीक्षण करण्याचा संदेश देणारा आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode