
वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील २२ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टची निवडणूक भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार पिया डांडिया यांनी जिंकली आहे. या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार केसी अस्कर यांचा पराभव केला. पिया डांडिया यांचा विजय भारतीय-अमेरिकी समुदायासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. फ्लोरिडामधून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहावर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी महिला ठरल्या आहेत. तसेच, अमेरिकन काँग्रेसवर निवडून जाणाऱ्या त्या दहाव्या भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत.
२०२६ च्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांदरम्यान दक्षिण फ्लोरिडामध्ये पिया डांडिया आणि केसी अस्कर यांच्यातील ही लढत सर्वाधिक चर्चेत असलेल्या निवडणुकांपैकी एक होती.मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, उच्च माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असलेल्या डांडिया यांना ५१.९ टक्के मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी केसी अस्कर यांना ४९.१ टक्के मते मिळाली. पिया डांडिया यांच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य भर शिक्षण, परवडणारे जीवनमान आणि आर्थिक संधी या मुद्द्यांवर होता. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्या फ्लोरिडातील नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या २२ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पिया डांडिया यांचा जन्म आणि बालपण पाम बीच काउंटीमध्ये गेले. त्या पहिल्या पिढीतील भारतीय-अमेरिकी आहेत. त्यांचे आई-वडील १९८० मध्ये जयपूरमधून अमेरिकेत आले आणि तिथेच स्थायिक झाले.भारतीय वंशाच्या डांडिया या माजी शिक्षिका असून, त्यांनी न्यूयॉर्कमधील हार्लेम येथे उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘व्हाइट हाऊस फेलो’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून, अॅपल या कंपनीतही सेवा बजावली आहे.कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या उद्देशाने डांडिया यांनी एका उच्च माध्यमिक शाळेची स्थापना केली होती. या शाळेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
विशेष म्हणजे, यापैकी ८६ टक्के विद्यार्थी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील होते.निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्या स्वतः स्थापन केलेल्या शाळेच्या संस्थापक मुख्याध्यापिका बनल्या होत्या. त्यामुळे देशातील सर्वात कमी वयाच्या उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांपैकी एक होण्याचा मान त्यांना मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode