
तेहरान, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांच्या पक्षाच्या या कामगिरीमागे इराणसोबत सुरू असलेले युद्ध हे प्रमुख कारण मानले जात आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या पिछाडीवर राहण्याबाबत इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेतील जनतेने युद्धाला नकार दिल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या निकालांवरून अमेरिकेतील नागरिक ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांच्या विरोधात संदेश देत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गालिबाफ यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या इच्छेविरोधात जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. वाढत्या महागाईमुळे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे त्रस्त असलेल्या अमेरिकन जनतेने युद्धाला नकार दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाची पिछाडी झाल्यानंतर इराणने एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक ट्रम्प यांना उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकताना दाखवण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या पक्षाच्या पिछाडीवर राहण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी इराणसोबत सुरू असलेले युद्ध हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष
सुरू असून, ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धाचा परिणाम निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीवर झाल्याचे सांगितले जात आहे. जवळपास दोन तृतीयांश अमेरिकन सैनिक या लष्करी कारवाईच्या विरोधात होते.
या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, जगभरात कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. तसेच, अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अद्याप चर्चा सुरू आहे. मात्र, इराण आपल्या अटींवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, टेक्सासमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने ३६ वर्षांनंतर गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या जीना हिनोजोसा यांना सुमारे ५६.८ टक्के मते मिळाली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode