
वॉशिंग्टन , 04 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या २०२६ मधील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपण स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असतो, तर रिपब्लिकन पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यम व्यासपीठावर पोस्ट करत म्हटले की, “मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो. जर मी निवडणूक लढवत असतो, तर आम्ही प्रचंड बहुमताने विजयी झालो असतो! या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.”विशेष म्हणजे, निवडणूक प्रचारादरम्यान रिपब्लिकन उमेदवारांच्या अनेक प्रचारसभांमध्ये ट्रम्प यांनी मतदारांना आवाहन केले होते की, त्यांनी आपण स्वतः निवडणूक लढवत असल्याचे समजून मतदान करावे.
माध्यमांशी बोलताना व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतरही मंगळवारी प्रशासनाची भूमिका पूर्णपणे ठाम होती. ट्रम्प यांनी अनेक राज्यांतील मतदारांना या निवडणुकीकडे आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळावरील जनमत चाचणी म्हणून पाहण्याचे आवाहन केले होते. मात्र, ते स्वतः या निवडणुकीत थेट उमेदवार नव्हते, असा युक्तिवाद या अधिकाऱ्याने केला.
अधिकाऱ्याच्या मते, ट्रम्प स्वतः निवडणुकीच्या मैदानात असतात, तेव्हा त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतात.रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीचे समर्थन करताना त्यांनी म्हटले की, पक्षाच्या उमेदवारांनी जितका प्रचार केला, त्यापेक्षा अधिक प्रभावी प्रचार स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी केला होता. उमेदवारांची गुणवत्ता हेदेखील निकालांवर परिणाम करणारे एक कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हाइट हाऊसच्या या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आजचे निकाल काहीही असले, तरी तथाकथित कट्टर डाव्या विचारसरणीच्या शक्तींविरोधात लढण्याचा ट्रम्प यांचा निर्धार आणखी मजबूत होईल. तसेच, त्यांनी इशारा देणाऱ्या सुरात ‘तयार राहा’, असेही म्हटले.
वृत्तानुसार, अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) डेमोक्रॅटिक पक्ष बहुमत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधी सभेवर नियंत्रण मिळवल्यास त्यांना संसदेच्या माध्यमातून ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराची व्यापक चौकशी आणि देखरेख करण्याचे अधिकार मिळतील. त्यामुळे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील शेवटची दोन वर्षे शेवटची दोन वर्षे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकतात. या निवडणूक निकालांमुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते हकीम जेफ्रीज यांच्यासाठी प्रतिनिधी सभेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष (स्पीकर) बनण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहातील औपचारिक मतदानाद्वारे त्यांना हे पद मिळवावे लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode