
माद्रिद, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. माद्रिदच्या दक्षिणेकडे झालेल्या वेगवान रेल्वे अपघाताला सहा दिवस उलटल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.या भीषण रेल्वे अपघातात ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्पेनमध्ये परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. यंदाच्या वर्षातील स्पेनमधील हा दुसरा मोठा रेल्वे अपघात होता.
परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांनी संसद सदस्यांना संबोधित करताना म्हटले, “स्पेनसारख्या देशात एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत दोन रेल्वे अपघात घडल्यानंतर परिवहन मंत्र्याने आपल्या पदावर कायम कसे राहावे? हा राजकीय प्रतिष्ठा, नैतिकता आणि अपघातातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त करण्याचा प्रश्न आहे.”
२८ ऑक्टोबर रोजी हा अपघात घडला होता. त्यावेळी वेगवान रेल्वेची रुळांवर आधीपासून उभ्या असलेल्या दुसऱ्या रेल्वेला जोरदार धडक बसली. माद्रिद-सेव्हिया रेल्वेमार्गावरील सुरक्षा यंत्रणेसाठी आवश्यक असलेली संपर्क प्रणाली बंद पडल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. माद्रिदमधील केंद्रीय नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी रेल्वे वाहतुकीची सूत्रे हाती घेतली आणि समोरील रुळांवर आधीच एक रेल्वे उभी असतानाही दुसऱ्या रेल्वेला पुढे जाण्याची परवानगी दिली. यंदाच्या वर्षात माद्रिद-सेव्हिया रेल्वेमार्गावर झालेला हा दुसरा मोठा अपघात होता.
यापूर्वी जानेवारी महिन्यात याच मार्गावर दक्षिणेकडे जाणारी एक रेल्वे रुळांवरून घसरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला धडकली होती. या अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे.स्पेनचे वेगवान रेल्वेचे जाळे ही देशाची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वेगवान रेल्वेचे जाळे स्पेनमध्ये आहे. तीन दशकांहून अधिक काळापूर्वी ही रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत स्पेनमध्ये अशा प्रकारचा एकही प्राणघातक रेल्वे अपघात झाला नव्हता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode