
वॉशिंग्टन , 04 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे प्राथमिक निकाल समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत भारतीय-अमेरिकी डेमोक्रॅटिक नेते सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.फ्लोरिडामधील काँग्रेसच्या एका अत्यंत चुरशीच्या मतदारसंघात डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया डांडिया यांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे विवेक रामास्वामी पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
व्हर्जिनियाच्या दहाव्या काँग्रेस मतदारसंघातून सुहास सुब्रमण्यम विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या सुब्रमण्यम यांना सुमारे ६३ टक्के मते मिळाली आहेत, तर त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डेव्ह बेकविथ यांना ३७ टक्के मते मिळाली आहेत. आतापर्यंत अंदाजित एकूण मतांपैकी सुमारे ९५ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे.या विजयामुळे २०२५ मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सुब्रमण्यम यांना आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. २०२४ मध्ये व्हर्जिनियातून काँग्रेसमध्ये निवडून जाणारे ते पहिले भारतीय-अमेरिकी सदस्य ठरले होते. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार अहसेन मलिक हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात होते.
शेजारील मेरीलँड राज्यात भारतीय-अमेरिकी उपराज्यपाल अरुणा मिलर यांनाही पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर मूर यांच्यासोबत निवडणूक लढवणाऱ्या मिलर यांनी रिपब्लिकन पक्षाचे उपराज्यपालपदाचे उमेदवार रॉब क्रोप यांचा पराभव केला आहे. क्रोप हे माजी राज्य प्रतिनिधी डॅन कॉक्स यांचे सहकारी उमेदवार होते.मिलर पुन्हा निवडून आल्यास अमेरिकेतील महत्त्वाच्या राज्यस्तरीय कार्यकारी पदांवरील भारतीय-अमेरिकी प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.
प्राथमिक आकडेवारीनुसार, फ्लोरिडाच्या २२व्या काँग्रेस मतदारसंघात डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया डांडिया यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार केसी असकर यांचा पराभव केला आहे. डांडिया यांना ५१.९ टक्के मते मिळाली, तर असकर यांना ४८.१ टक्के मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील अंदाजित एकूण मतांपैकी सुमारे ९७.६ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रतिनिधी सभेवरील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) नियंत्रण निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या निवडक मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ होता.
ओहायोमध्ये गव्हर्नरपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या प्राथमिक निकालांनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमी अॅक्टन यांनी भारतीय-अमेरिकी रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांना पराभूत केल्याचे चित्र आहे.एकूणच, या प्राथमिक निकालांमुळे भारतीय-अमेरिकी डेमोक्रॅटिक नेत्यांना सुरुवातीचे यश मिळाल्याचे दिसत आहे. मात्र, इतर अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमधील निकालांचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode