अमरावती मनपातील २०१८ मधील ठरावाच्या अंमलबजावणीची मागणी
विहिरी, तलाव, हातपंप आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष नगरसेवक दिनेश बुब यांचे आयुक्तांना निवेदन अमरावती, ०४ नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती शहरासह जिल्ह्यातील दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी, वाढते तापमान आणि मर्यादित जलसा
2018 च्या जलसाठा पुनर्जीवनाची अंमलबजावणी करा दिनेश बुब यांची मनपा आयुक्तांकडे मागणी


विहिरी, तलाव, हातपंप आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

नगरसेवक दिनेश बुब यांचे आयुक्तांना निवेदन

अमरावती, ०४ नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती शहरासह जिल्ह्यातील दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी, वाढते तापमान आणि मर्यादित जलसाठे लक्षात घेता शहरातील पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी १९ जुलै २०१८ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठराव क्रमांक ३१ ची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात नगरसेवक दिनेश बुब यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

अमरावती शहरात पाण्याचा अपव्यय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे तसेच जुन्या विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांचे संवर्धन व पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र, शहरात घरगुती तसेच सार्वजनिक स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप आणि तलावांच्या जतन व पुनर्जीवनाकडेही दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील अनेक भागांत नळांच्या तुटलेल्या तोट्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. वारंवार दुरुस्ती करूनही अशा समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे घटणारी भूजल पातळी यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, १९ जुलै २०१८ रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ३१ सूचक दिनेश बुब व चेतन पवार यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत झाली असती, तर गेल्या काही वर्षांत शहरातील जलसाठ्यांची उपलब्धता वाढविण्यास मदत झाली असती, असे नागरिकांचे मत आहे. मात्र, अद्यापही या विषयावर अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने झोननिहाय भूजल पातळी, उपलब्ध जलसाठे, खासगी व सार्वजनिक विहिरी, हातपंप, तलाव आणि इतर जलस्रोतांची सविस्तर माहिती संकलित करावी. त्यानुसार जलस्रोतांच्या संवर्धनासाठी आणि पुनर्भरणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रक्रियेत जागरूक नागरिक, जलतज्ज्ञ, संबंधित विभागांचे अधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच माजी आमदार आणि खासदार यांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा. त्यानंतर विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन शहर व ग्रामीण भागातील पारंपरिक जलसाठ्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असेही नागरिकांनी सुचविले आहे.

अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक बनत असताना महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी नगरसेवक दिनेश बुब यांच्या निवेदनातील मागण्यांची तातडीने दखल घेऊन २०१८ च्या मंजूर ठरावाची अंमलबजावणी करावी आणि जलसंधारणासाठी ठोस कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी अमरावतीकर नागरिकांनी केली आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande