

रायगड, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। कर्जत-कल्याण राज्य महामार्गावरील साईडपट्टी आणि दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि तुटलेल्या गतिरोधकांमुळेही अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, अशी मागणी सागर शेळके यांनी केली आहे.
महामार्गावरील अनेक ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे रस्त्याच्या कडांचा तसेच दुभाजकांचा अंदाज येण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी डिकसल येथील एका युवकाचा उमरोळी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोशाणे, डिकसल यांसह महामार्गावरील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणचे गतिरोधक तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असल्याचे शेळके यांनी निदर्शनास आणले आहे.
सदर रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रस्ता बांधणाऱ्या कंपनीकडे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीकडून आवश्यक कामे करून घ्यावीत. साईडपट्टी व दुभाजकातील गवत कापणे, खड्डे बुजविणे आणि तुटलेल्या गतिरोधकांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी सागर शेळके यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)