
अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी चित्ररथाद्वारे जनजागृती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते हिरवा झेंडा
नाशिक, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने हा जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आणि माहिती अधिकारी गोपाल साळुंखे उपस्थित होते.
योजनांची माहिती थेट गावपातळीवर
हा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे. योजनांचे स्वरूप, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती सोप्या व प्रभावी पद्धतीने चित्ररथावर सादर करण्यात आली आहे.चित्ररथाच्या माध्यमातून गावपातळीवर थेट जनजागृती केली जाणार असून, नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ देणे, वंचित व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे, या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'योजनांची माहिती प्रत्येक गावात, विकासाची संधी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला' या संकल्पनेतून चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी जनजागृती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी प्रास्ताविकातून चित्ररथ आणि जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या प्रसिद्धी नियोजनाची माहिती दिली.या उपक्रमामुळे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI