सणासुदीत पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा; १०३ गाव-वाड्यांतील ७१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाची प्रभावी उपाययोजना नाशिक, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सणासुदीच्या काळातही स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री श्री. गि
सणासुदीत पिण्याच्या पाण्याचा अखंड पुरवठा; १०३ गाव-वाड्यांतील ७१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा


पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाची प्रभावी उपाययोजना

नाशिक, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।

: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सणासुदीच्या काळातही स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील ३५ गावे व ६९ वाड्या-वस्त्या अशा एकूण १०३ ठिकाणी ३७ टँकरद्वारे नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून ७१ हजार ७२९ नागरिकांना त्याचा लाभ होत आहे.

चांदवड तालुक्यातील एका गावासाठी एक टँकरद्वारे २ हजार ७२७ नागरिकांना, तर देवळा तालुक्यातील एका गावासाठी एक टँकरच्या माध्यमातून २ हजार ९९३ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील ६ गावे व १४ वाड्या-वस्त्या अशा २० ठिकाणी ६ टँकरद्वारे १३ हजार १४० नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई येवला तालुक्यात असून, तेथील २७ गावे व ५५ वाड्या-वस्त्या अशा ८२ ठिकाणी २९ टँकरद्वारे ५२ हजार ८६९ नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीटंचाईग्रस्त भागांचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून, आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविणे, पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना अखंड व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पालकमंत्री श्री. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवत असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande