
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : मोझरी येथील गुरुकुंजात सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात श्रद्धांजलीपूर्वी वाचण्यात आलेल्या एका निवेदनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निवेदनात युवकांचा व त्यांनी उभारलेल्या आंदोलनांचा उल्लेख ज्या पद्धतीने करण्यात आला, त्यावर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.
महोत्सवादरम्यान वाचण्यात आलेल्या निवेदनात, देशात सध्या छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून तरुणांच्या माध्यमातून आंदोलने उभी केली जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. या निवेदनात अशा आंदोलनांना 'अराजकता' संबोधत विशेषतः तरुण वर्गाला लक्ष्य करून त्यांच्या मनात विष कालवले जात असल्याचा आशय व्यक्त करण्यात आला.
या निवेदनावर संताप व्यक्त करत अमोल मिटकरी म्हणाले, इथल्या तरुण वर्गाला वेड्यात काढलं.. त्यांना आतंकवादी म्हणण्यापर्यंत हिम्मत केली. हे स्क्रिप्ट वाचणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच ते लिहिणारा देखील दोषी आहे. मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. या घटनेमागे नेमका कोणता मास्टरमाईंड आहे, याचा तत्काळ शोध घेण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे सर्वधर्म समभाव, सामाजिक एकता आणि युवा शक्तीच्या सकारात्मक ऊर्जेवर आधारित आहेत. मात्र, या महोत्सवातील वादग्रस्त निवेदनामुळे राष्ट्रसंतांच्या या मूळ शिकवणुकीलाच तिलांजली दिली जात असल्याचा गंभीर आरोप आता केला जात आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोझरी महोत्सवात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी