
येवला, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। येवला तालुक्यातील पारेगाव येथील अशोक लक्ष्मण खिल्लारे (वय ४५) या शेतकर्याने, ऐन दिवाळीच्या तोंडावर राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर यामुळे हे शेतकरी आर्थिक विवंचनेत होते.’सण कसा साजरा करायचा? मुलांचे पोट कसे भरायचे आणि डोक्यावरचे कर्ज कसे फेडायचे?’ या चिंतेने त्यांना इतके ग्रासले की त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या दुर्दैवी घटनेमुळे पारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI