रायगड - शिवगाव जमीन वाद चिघळला; कागदपत्रे आणि मोजणी प्रक्रियेवर आक्षेप
रायगड, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। मौजे शिवगाव येथील गट क्रमांक ८५/२ मधील जमिनीच्या मालकी आणि मोजणीवरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित जमीन वडिलोपार्जित असल्याचा दावा संदीप रामदास हाडप यांनी केला असून, करण राठोड यांनी या जागेबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्
Shivgaon-land-dispute-escalate


Shivgaon-land-dispute-escalate


Shivgaon-land-dispute-escalate


रायगड, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। मौजे शिवगाव येथील गट क्रमांक ८५/२ मधील जमिनीच्या मालकी आणि मोजणीवरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित जमीन वडिलोपार्जित असल्याचा दावा संदीप रामदास हाडप यांनी केला असून, करण राठोड यांनी या जागेबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी त्यासंबंधी कागदपत्रे सादर केली नसल्याचा आरोप हाडप यांनी केला आहे.

जमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाचे सर्व्हेअर संदीप सत्यवान थोरवे आणि पोलीस अधिकारी कराले उपस्थित होते. हाडप यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत देत मोजणीला विरोध दर्शविला. त्यानंतर संपूर्ण मोजणी न करता केवळ चार पॉईंट पाहून हरकत पंचनाम्यात नोंदविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण मोजणी झाल्याचा उल्लेख असलेला जबाब तयार करून त्यावर सही घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर चुकीच्या जबाबावर सही करण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, ग्रुप ग्रामपंचायत नावंढेने दिलेल्या दाखल्यावरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सीताबाई गोपाळ राठोड यांनी 'हॉटेल रिलॅक्स बार अँड रेस्टॉरंट'साठी परवानगी मागितली असताना प्रत्यक्ष जागेवर 'हॉटेल ओम (व्हेज अँड नॉनव्हेज)' सुरू असल्याचे हाडप यांनी निदर्शनास आणले. परवानगी आणि प्रत्यक्ष बांधकाम व व्यवसाय यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, अनधिकृत बांधकामाला प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस बळाचा वापर करून पाठबळ दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोजणी करायची असल्यास दिवाणी न्यायालयामार्फत कोर्ट कमिशन नियुक्त करून रीतसर मोजणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप थांबवला नाही, तर संबंधित जागेवर आत्मदहन करण्याचा इशाराही हाडप यांनी दिला आहे. या प्रकरणातील आरोपांवर ग्रामपंचायत आणि प्रशासनाची अधिकृत बाजू समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande