
कोल्हापूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)।शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर 'स्मॅक' च्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे भरत बापूसाहेब जाधव, तर उपाध्यक्षपदी उषा एंटरप्रायझेसचे प्रशांत शिवाजीराव शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. स्मॅक भवन येथील कै. मोहनराव शिरगावकर हॉलमध्ये बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या ३४ व्या मासिक सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली एमआयडीसी असोसिएशन आणि उद्योगजगताच्या विकासासाठी गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या 'स्मॅक'ने सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. उद्योजकांच्या समस्या, औद्योगिक विकास, कामगार कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने आजवर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आता नूतन कार्यकारिणीवर असणार आहे.
ऑन. सेक्रेटरीपदी मिनर्व्हा एंटरप्रायझेसचे शेखर श्रीकांत कुसाळे, तर खजिनदारपदी श्री शुभम टर्निंग सेंटरचे बदाम लक्ष्मण पाटील यांची फेर निवड करण्यात आली.
स्मॅक आयटीआयच्या चेअरमनपदी चौगले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप जयसिंगराव चौगले, तर स्मॅक क्लस्टरच्या चेअरमनपदी चौगुले इंडस्ट्रीजचे सुरेश लक्ष्मण चौगुले यांची फेर निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष भरत जाधव यांनी आगामी वर्षातील कामांची दिशा स्पष्ट करताना सांगितले की, संस्थेकडे सध्या अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. त्यापैकी प्रामुख्याने स्मॅकचे नूतन ऑडिटोरियम उभारणे, संस्थेच्या घटनेत आवश्यक दुरुस्ती करणे आणि लघु व मध्यम उद्योजकांच्या (SME) विविध समस्या सोडविणे या कामांना प्राधान्य देण्यात येईल. ही कामे सर्वांच्या सहकार्याने हाती घेऊन चालू वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. याच अनुषंगाने ऑडिटोरियमच्या बांधकामासाठी सुमंत पाटील आणि एम. वाय. पाटील यांची नावे सुचविण्यात आली. सभेत त्यांची बांधकाम समितीवर निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, भरत जाधव यांच्या कुटुंबाचे स्मॅकच्या नेतृत्वाशी जुने नाते आहे. त्यांचे वडील परशुराम एस. जाधव ऊर्फ बापू जाधव यांनी १७ ऑक्टोबर २००५ ते १७ नोव्हेंबर २००७ या कालावधीत स्मॅकचे अध्यक्षपद भूषविले होते. आता त्यांचे चिरंजीव भरत जाधव यांची त्याच अध्यक्षपदी निवड झाल्याने संस्थेच्या नेतृत्वाची परंपरा पुढील पिढीकडे सोपविली गेल्याचे चित्र आहे. बापू जाधव यांनी १ जानेवारी १९८४ पासून २०१३ पर्यंत संस्थेचे संचालक म्हणूनही योगदान दिले आहे.
मावळते अध्यक्ष जयदीप चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस संचालक सुरेंद्र जैन, राजू पाटील, अतुल पाटील, नीरज झंवर, सचिन पाटील, रणजीत जाधव, सुमंत पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar