कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी २५ लाखांपर्यंत अनुदान; शेतकरी, एफपीओ आणि संस्थांना मोठी संधी!
लातूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येण
शेतकऱ्यांना सुवर्णसंधी


लातूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था तसेच नोंदणीकृत संस्थांना घेता येणार आहे. पात्र घटकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के अनुदान

या योजनेअंतर्गत पात्र प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. एका प्रक्रिया युनिटची किमान क्षमता ३०० किलो प्रतितास असणे आवश्यक आहे. यामध्ये डाळ मिलसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी, इमारत, गोदाम आणि साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे.

डाळ मिलच्या क्षमतेनुसार अनुदान मर्यादा

यंत्रसामग्रीच्या प्रकारानुसार आणि क्षमतेनुसार अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

* ३०० किलो प्रतितास क्षमतेची मिनी डाळ मिल : १ लाख ९३ हजार २८६ रुपये.

* ५०० किलो प्रतितास क्षमतेची मिनी डाळ मिल : ५ लाख ३० हजार ३५७ रुपये.

* १ टन प्रतितास क्षमतेची अर्धस्वयंचलित डाळ मिल : १३ लाख २० हजार रुपये.

* २ टन प्रतितास क्षमतेची अर्धस्वयंचलित डाळ मिल : २४ लाख ५१ हजार ४२९ रुपये.

* १ टन तसेच ३ ते ४ टन प्रतितास क्षमतेची पूर्ण स्वयंचलित डाळ मिल : कमाल २५ लाख रुपये.

केवळ यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान घेतल्यास संबंधित यंत्रसामग्रीसाठी निश्चित केलेल्या मर्यादेनुसार अनुदान देण्यात येणार आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), आवश्यक यंत्रसामग्रीचे दरपत्रक, पॅन कार्ड, मूळ सातबारा व आठ-अ उतारा सादर करणे आवश्यक आहे. स्वतःची जागा नसल्यास किमान १० वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा आवश्यक राहील. तसेच बांधकामाचा समावेश असलेल्या प्रकल्पांसाठी बांधकामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक सादर करावे लागणार आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीयीकृत, व्यापारी किंवा इतर मान्यताप्राप्त बँकेकडून प्रकल्पासाठी कर्ज मंजूर असणे आवश्यक आहे. अनुदानाचे वितरण 'क्रेडिट लिंक्ड बॅक-एंडेड सबसिडी' या पद्धतीने करण्यात येणार आहे.

१५ टक्के स्वनिधी उभारणे आवश्यक

लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम स्वतःचा हिस्सा अर्थात मार्जिन मनी म्हणून उभारावी लागणार आहे. यंत्रसामग्रीची उभारणी आणि भौतिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजूर अनुदानाच्या ५० टक्के रकमेचे वितरण केले जाईल. उर्वरित ५० टक्के अनुदान प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर देण्यात येणार आहे.

शासकीय नियमानुसार एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला किंवा घटकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना केवळ कच्चा माल विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची आणि स्वतःचा प्रक्रिया उद्योग उभारण्याची या योजनेमुळे संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था आणि संबंधित घटकांनी अधिक माहितीसाठी तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande