अमरावतीतील तलाठी निलंबित: महसूल अभिलेखात गंभीर गैरव्यवहार भोवला
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात महसूल अभिलेखात गंभीर फेरफार आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संतोष गणेशराव चपटे यांना मंगळवारी निलंबित केले आहे. गेल्या दोन महिन्यांत एका महि
अमरावतीतील तलाठी निलंबित: महसूल अभिलेखात गंभीर गैरव्यवहार भोवला


अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात महसूल अभिलेखात गंभीर फेरफार आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संतोष गणेशराव चपटे यांना मंगळवारी निलंबित केले आहे. गेल्या दोन महिन्यांत एका महिला नायब तहसीलदारासह एक मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांवर झालेली ही कारवाई महसूल वर्तुळात मोठी चर्चाचा विषय ठरली आहे.

उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदारांच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. तलाठी चपटे हे अमरावती तहसील कार्यालयांतर्गत बेनोडा, वडाळी आणि अकोली भाग-१ या साजांमध्ये कार्यरत असताना त्यांनी हस्तलिखित व संगणकीकृत फेरफार नोंदींमध्ये नियमबाह्य प्रकार केल्याचे उघडकीस आले.मौजा वडाळी (फेरफार क्र. ७,०२२ ते ७,१५२) आणि मौजा बेनोडा (फेरफार क्र. २१,६७४ ते २२,३१८) मधील शेकडो फेरफार नोंदींच्या तपासणीत हे गैरव्यवहार समोर आले.

याप्रकरणी प्रशासनाकडून बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला तलाठी संतोष चपटे यांनी सादर केलेले स्पष्टीकरण पूर्णपणे असमाधानकारक ठरल्याने प्रशासनाने ते फेटाळून लावले.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (अ) नुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, निलंबन कालावधीत तलाठी संतोष चपटे यांचे मुख्यालय धारणी तहसील कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे महसूल विभागातील नियमबाह्य कारभाराला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande