
कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी सुरू पर्वणी स्नानाच्या तारखा, प्रवास, निवास आणि सुविधांची माहिती मिळणार एकाच ठिकाणी
नाशिक, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : सिंहस्थ कुंभपर्व २०२७ च्या तयारीला ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याने औपचारिक प्रारंभ झाल्यानंतर आता भाविकांच्या सोयीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाची माहिती भाविकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणारे भाविक, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक तसेच प्रसारमाध्यमांसाठी हे संकेतस्थळ महत्त्वाचे माहिती व्यासपीठ ठरणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in
कुंभमेळ्याशी संबंधित माहिती विविध माध्यमांतून शोधण्याऐवजी ती एकाच अधिकृत व्यासपीठावर उपलब्ध करून देणे, हा संकेतस्थळ सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, धार्मिक स्थळांची माहिती, प्रवासाचे नियोजन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षाविषयक सूचनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार असून, आगामी काळात अधिक माहिती आणि डिजिटल सेवांची भर पडणार आहे.
कुंभयात्रेचे नियोजन होणार अधिक सुलभ
सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, इतिहास, परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय तसेच स्थानिक प्रवासासंबंधी माहितीही भाविकांना मिळणार आहे.
याशिवाय स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, निवास व्यवस्था, वाहनतळ आणि मदत कक्ष यांची माहिती टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित सूचनांनाही संकेतस्थळावर प्राधान्य देण्यात येणार आहे.
अधिकृत माहितीच्या प्रसारासाठी सहकार्याचे आवाहन
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी ही विविध शासकीय विभाग आणि संस्थांच्या समन्वयातून होणारी व्यापक प्रक्रिया आहे. त्यामुळे संकेतस्थळावरील अधिकृत माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका, लोकप्रतिनिधी, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील संस्था, धार्मिक संस्था, निवास व्यवस्था पुरविणारे व्यावसायिक आणि प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध विभागांची अधिकृत संकेतस्थळे, समाजमाध्यमांवरील खाती, जनजागृती मोहिमा आणि संबंधित संस्थांच्या संपर्क यंत्रणांद्वारे या संकेतस्थळाची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येणार आहे. प्रसारमाध्यमांनीही कुंभमेळ्याशी संबंधित बातम्या प्रसिद्ध करताना अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ द्यावा, जेणेकरून नागरिकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यास मदत होईल.
सिंहस्थ कुंभपर्वाच्या तयारीला वेग येत असताना भाविकांना प्रवासाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रम, आवश्यक सुविधा आणि सुरक्षाविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी हे संकेतस्थळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI