
भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आणण्याचा दिला इशारा
गोदावरीच्या प्रदूषणापासून रस्त्यांच्या कामांपर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका
नाशिक, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. प्रत्यक्षात विकासकामे दिसत नसताना चांगले रस्ते खोदून निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. सिंहस्थासाठी खर्च होणारा प्रत्येक पैसा जनतेचा असून, त्याचा हिशोब मागणारच, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
नाशिक दौऱ्यादरम्यान गोदावरी नदीचे दर्शन आणि काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सिंहस्थाच्या कामांवरील खर्चाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. उज्जैन येथे सुमारे ३ हजार १०० कोटी, तर प्रयागराज येथे साडेसात हजार कोटी रुपयांत कुंभमेळा पार पडला. मग नाशिकमध्ये ३५ हजार कोटी रुपये नेमके कुठे खर्च होत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धार्मिक कार्याच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करताना पवार म्हणाले की, सिंहस्थासाठी लाखो भाविक गोदावरीत स्नान करणार असताना नदीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर असून, पाण्यात क्रोमियमचे प्रमाण धोकादायक असल्याचा दावा त्यांनी केला. नदीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देण्याऐवजी बाह्य कामांवर खर्च केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण केल्याने नदीचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट न देणे, महंतांसाठी योग्य आसनव्यवस्था नसणे आणि नाशिककरांना कार्यक्रमाचे पास उपलब्ध न होणे, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दोन्ही खासदारांना देखील योग्य जागा मिळाली नसल्याचे ते म्हणाले. ध्वजारोहण कार्यक्रमात संत निवृत्तीनाथ महाराज यांचा उल्लेख न झाल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला.
अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट हटवण्याचे कारण काय, असा सवाल करत त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही प्रशासनाला लक्ष्य केले.
सीएसआर निधीतून ३ हजार ६०० झाडे लावण्याचे नियोजन असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १ हजार ५०० कोटी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार, विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांना फायदा होण्यासाठी नियमांमध्ये बदल आणि प्रस्तावित रिंगरोडमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आरोपही त्यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या परिचयातील व्यक्तींना कामे दिल्याबाबतची माहिती समोर आणणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या ५० कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण विभागाला एसटीपी प्लांट उभारण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. काँक्रिटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करणे, अपूर्ण विकासकामे आणि जागतिक विक्रमाच्या नावाखाली ३५ लाख रुपये खर्च करणे, या मुद्द्यांवरही त्यांनी स्पष्टीकरण मागितले.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोटकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे सांगत, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आतापर्यंत १६ ते १७ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासन लोकप्रतिनिधींनाही विकासकामांची माहिती देत नसल्याचा आरोप करत, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माहिती देऊ नये, असे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. भ्रष्टाचारासंदर्भातील पुरावे आपल्याकडे असून, अधिवेशनापूर्वी ते सार्वजनिक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
माहिती न दिल्यास न्यायालयात जाणार; दिवाळीनंतर पुन्हा नाशिक दौरा
सिंहस्थाच्या कामांवरील खर्चाची माहिती लोकप्रतिनिधी म्हणून मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती उपलब्ध करून न दिल्यास न्यायालयात जाणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर पुन्हा नाशिक दौरा करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या कामांसाठी आमदारांचे पत्र मागणे म्हणजे सरपंचांचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या फोनवरील संभाषणाबाबत विचारले असता, मोठे नेते म्हणून अनेकजण त्यांना फोन करून विचारपूस करतात, त्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI