
तेहरान, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर त्याचे पडसाद इराणमध्येही उमटले. राजधानी तेहरानमध्ये नागरिकांनी ट्रम्प, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पोस्टर्स जाळून निषेध व्यक्त केला.
इराणमधील सरकार समर्थक आणि कट्टरतावादी गटांनी अमेरिकन व इस्रायली नेत्यांची छायाचित्रे जाळून ट्रम्प प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त केला. यावेळी अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची झालेली पिछेहाट पाहून आंदोलकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला बसलेल्या धक्क्यामागे इराणशी संबंधित लष्करी तणाव आणि वाढती महागाई हे प्रमुख मुद्दे ठरले. निवडणुकीदरम्यान पेट्रोलसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे मतदारांमध्ये नाराजी होती. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने हे मुद्दे आक्रमकपणे उपस्थित केले. त्याचा पक्षाला निवडणुकीत फायदा झाला.इराणशी संबंधित संघर्षाबाबत अमेरिकन मतदारांमध्ये असलेली चिंताही ट्रम्प प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरली. निवडणुकीच्या निकालांनी परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे मुद्दे अमेरिकेच्या राजकारणावर किती प्रभाव टाकू शकतात, हे स्पष्ट केले.
निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाईच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. इराणमधील युद्धामुळे पेट्रोलच्या किमती वाढल्याचे त्यांनी मान्य केले. परिणामी, अमेरिकन नागरिकांवरील महागाईचा बोजा वाढला.डेमोक्रॅटिक पक्षाकडून महाभियोग आणण्याच्या शक्यतेवरही ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आपल्याला त्याची कोणतीही चिंता नसल्याचे सांगतानाच विरोधकांनी असे पाऊल उचलल्यास त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही रिपब्लिकन पक्षाच्या खराब कामगिरीसाठी इराणमधील युद्धाला जबाबदार धरले. युद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे मतदारांच्या निर्णयावर परिणाम झाल्याचे त्यांचे मत आहे. व्हान्स यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी त्यांचे म्हणणे समजण्यासारखे असल्याचे सांगितले. मात्र, इराणला अण्वस्त्रनिर्मिती करण्यापासून रोखणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतरही ट्रम्प प्रशासनाकडून इराणविरोधातील धोरणाचे समर्थन सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode