बांगलादेशात कामगार आंदोलन चिघळले; हजारो पोलिस तैनात, १०० कारखान्यांचे काम बंद
ढाका, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात किमान वेतनवाढीच्या मागणीसाठी वस्त्रोद्योगातील कामगारांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. बुधवारी राजधानी ढाका आणि आसपासच्या औद्योगिक परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासा
बांगलादेशात कामगार आंदोलन चिघळले; हजारो पोलिस तैनात, १०० कारखान्यांचे काम बंद


ढाका, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशात किमान वेतनवाढीच्या मागणीसाठी वस्त्रोद्योगातील कामगारांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. बुधवारी राजधानी ढाका आणि आसपासच्या औद्योगिक परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच स्टन ग्रेनेडचा वापर केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे देशातील शेकडो वस्त्रनिर्मिती कारखान्यांमधील कामकाज ठप्प झाले आहे.

कामगारांची किमान मासिक वेतन १२,५०० टका वरून ३० हजार टका करण्याची मागणी आहे. महागाई आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण निर्माण झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.कामगारांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे बांगलादेशातील प्रमुख वस्त्रोद्योग क्षेत्रांमधील उत्पादनावर परिणाम होत आहे. बांगलादेशच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात सुमारे ४० लाख लोक काम करतात. यामध्ये बहुतांश महिला कामगारांचा समावेश असून, त्या ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याचे १२,५०० टका इतके किमान मासिक वेतन अपुरे असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे वेतन वाढवून ३० हजार टका करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्नधान्य, निवास आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सध्याच्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याचे कामगारांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी ढाका येथे सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाचा विस्तार बुधवारी आसपासच्या औद्योगिक भागांमध्येही झाला. नारायणगंज जिल्ह्यातील फतुल्लाह परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या घटनेत अनेक डझन लोक जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. बांगलादेशातील वृत्तानुसार, पोलिसांनी फतुल्लाह परिसरातून अनेक आंदोलकांना अटकही केली. दुसरीकडे, गाझीपूर जिल्ह्यात कामगारांनी प्रमुख महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.

कामगारांच्या आंदोलनाचा फटका बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाला बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ढाक्याजवळील सावर परिसरातील अशुलिया येथे सुमारे १०० कारखाने बंद राहिले. अशुलिया औद्योगिक पोलिसांचे अधीक्षक मोमिनुल इस्लाम भुईयां यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील जवळपास १०० कारखान्यांचे कामकाज बंद आहे. दरम्यान, राजधानी ढाक्यातील मीरपूर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी १० हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा परिसर कामगारांच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या क्षेत्रातून देशाला दरवर्षी सुमारे ४० अब्ज डॉलरचे निर्यात उत्पन्न मिळते. देशात जवळपास २,५०० वस्त्रनिर्मिती कारखाने असून, सुमारे ४० लाख कर्मचारी या उद्योगाशी संबंधित आहेत. त्यामुळे कामगारांचे आंदोलन आणि कारखाने बंद राहिल्याने उत्पादनासह निर्यात व्यवहारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने नवीन वेतन मंडळाची स्थापना केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित मुद्द्यांवर निर्णय घेण्याची जबाबदारी या मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. वेतन मंडळाचे अध्यक्ष सय्यद आझाद सुब्हानी यांनी सांगितले की, नव्या वेतनश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात पहिले वेतन मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande