
आता अवघ्या70 मिनिटांत तळकोकण गाठता येणार
नवी मुंबई,05 नोव्हेंबर (हिं.स.) : नवी मुंबईहून आता अवघ्या सव्वा तासात तळकोकणात पोहोचणे शक्य होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी विमानतळ अशी आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोशल मीडियावर या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी चिपी येथून विमान नवी मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल आणि सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईत दाखल होईल. म्हणजेच दोन्ही शहरांमधील हवाई प्रवासासाठी अवघे ७० मिनिटे लागणार आहेत.
सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा
आतापर्यंत चिपी विमानतळावरून नियमित हवाई वाहतुकीच्या उपलब्धतेबाबत अनेक अडचणी होत्या. मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ते किंवा रेल्वे प्रवासासाठी अनेक तास खर्च करावे लागत होते. मात्र आता रविवारसह आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना मोठा पर्याय मिळणार आहे. या सेवेमुळे व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक तसेच मुंबई आणि नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
नारायण राणेंच्या प्रयत्नांतून उभे राहिले विमानतळ; नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उभारण्यात खासदार नारायण राणे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवाई वाहतुकीने जोडता यावे, या उद्देशाने या विमानतळाची उभारणी करण्यात आली. मात्र विमानतळ सुरू झाल्यानंतरही नियमित आणि सोयीस्कर विमानसेवा उपलब्ध होण्याचे आव्हान कायम होते. आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
विमानसेवेसाठी 16 कोटी 74 लाखांचा निधी मंजूरचिपी विमानतळावरील हवाई वाहतूक वाढविण्यासोबतच कोकणातील पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या सेवेसाठी एका वर्षाच्या कालावधीकरिता 16 कोटी 74 लाख 62 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोकणच्या पर्यटनाला मिळणार नवे पंख !
सिंधुदुर्ग हा निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. तारकर्ली, देवबाग, मालवण, वेंगुर्ला यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि इतर शहरांमधून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सातही दिवस उपलब्ध होणाऱ्या विमानसेवेमुळे पर्यटकांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन सेवा आणि व्यापारालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, कोकणातील हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रत्नागिरीतील अत्याधुनिक विमानतळाचाही विकास महत्त्वाचा ठरणार आहे.
सेवा सुरू होण्याच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष
विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी प्रत्यक्ष सेवा कोणत्या तारखेपासून सुरू होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ही तारीख लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चिपी ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी असा हवाई प्रवास करण्यासाठी उत्सुक असलेल्या कोकणवासीयांचे लक्ष आता अधिकृत प्रारंभदिनाकडे लागले आहे.एकंदरीत, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग यांच्यातील अंतर कमी करणारी ही विमानसेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता तळकोकणाच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी