
अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। माहे जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार, ४४ कोटी २१ लाख ३३ हजार रुपये निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत मंगळवार,३ नोव्हेंबर रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आले अतिवृष्टीमुळे व पुरामुळे जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, धारणी, चिखलदरा, मोर्शी आणि तिवसा या तालुक्यांमधील एकूण ४०,९५७.१२ हेक्टर आर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून एकूण ३७ हजार १५ शेतकरी बाधित झाले.
शासनाद्वारे मंजूर मदत निधीतून अंजनगाव सुर्जी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ३२ बाधित शेतकऱ्यांच्या ७.४५ हेक्टर क्षेत्रावरील कायमस्वरूपी जमिनीच्या नुकसानीसाठी ३ लाख ५० हजरांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील २५०६ बाधित शेतकऱ्यांच्या ७६१.२१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी १ कोटी ४२ लाख १९ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.शासन निर्देशानुसार, मंजूर मदतीची रक्कम डिबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही मदत केवळ अल्प व अत्यंत अल्प भूधारक शेतकऱ्यांना कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मिळालेला हा मदतीचा निधी बँकांनी कोणत्याही कर्ज खात्यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करू नये, असे सक्त आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संतोष कोकडे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी