रावळकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून आंदोलकांवर गोळीबार; ३ जण ठार, १८ जखमी
इस्लामाबाद, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील रावळकोट येथे बुधवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर भीषण हल्ला केला.उमर फारुख चौक परिसरात ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर
रावळकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून आंदोलकांवर गोळीबार; ३ जण ठार, १८ जखमी


इस्लामाबाद, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील रावळकोट येथे बुधवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर भीषण हल्ला केला.उमर फारुख चौक परिसरात ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १८ जण जखमी झाले. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजता गोळीबार सुरू झाला आणि तो अनेक तास सुरू होता.

शहरातील अनेक भागांमध्ये घरांवर गोळे डागण्यात आल्याने आग लागली. व्हिडिओ फुटेजमध्ये जळणारी घरे आणि सर्वत्र विखुरलेले गोळ्यांचे तुकडे स्पष्टपणे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्याने जाणीवपूर्वक निःशस्त्र आंदोलक आणि सर्वसामान्य कुटुंबांना लक्ष्य केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. काही कुटुंबांनी हा हल्ला म्हणजे आपल्याविरोधात मृत्यूचे फर्मान जारी करण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया दिली. लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केल्याचे आरोपही करण्यात येत आहेत.

अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. जून २०२६ मध्ये आंदोलनांना सुरुवात झाल्यापासून पाकव्याप्त भागात पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत १५३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याचा सर्वाधिक फटका रावळकोटला बसला आहे. सरकारी मोबाइल सेवा आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.आंदोलकांच्या मागण्या केवळ स्वस्त वीज आणि स्वस्त पीठ मिळण्यापुरत्या मर्यादित नाहीत. विधानसभेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, स्थानिक संसाधनांवरील नियंत्रण स्थानिकांच्या हाती असावे आणि प्रशासकीय स्वायत्तता मिळावी, अशा मागण्याही ते करत आहेत.

असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याकडून दडपशाही केली जात असली, तरी आपण माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांचे संबंध नेमके कसे आहेत, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande