ट्रम्प प्रशासनात मोठ्या फेरबदलांचे संकेत; सर्जिओ गोर यांचे नाव दोन महत्त्वाच्या पदांसाठी चर्चेत
वॉशिंग्टन , 05 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब झाल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये आता परिस्थिती सावरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठे फेरबदल होण्
ट्रम्प प्रशासनात मोठ्या फेरबदलांचे संकेत; सर्जिओ गोर यांचे नाव दोन महत्त्वाच्या पदांसाठी चर्चेत


वॉशिंग्टन , 05 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब झाल्यानंतर वॉशिंग्टनमध्ये आता परिस्थिती सावरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यावधी निवडणुकांतील पराभवानंतर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचे नाव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदासाठी चर्चेत आले आहे. गोर यांच्याकडे व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ किंवा परराष्ट्रमंत्री यांसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

एका वृत्तानुसार, प्रशासनातील अंतर्गत घडामोडींची माहिती असलेल्या १० व्यक्तींनी सांगितले की, ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या उत्तरार्धात गोर यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोर यांनी यापूर्वीही व्हाइट हाऊसमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. ते ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्येही गोर पदोन्नती मिळविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

प्रशासनावर मजबूत पकड आणि थेट ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोच असल्यामुळे अलीकडच्या काळात गोर अनेक उच्चस्तरीय राजनैतिक बैठकांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारतातील अमेरिकेचे राजदूत या भूमिकेच्या पलीकडेही त्यांचा प्रभाव वाढला आहे. गोर हे मार्को रुबियो यांचेही निकटवर्तीय मानले जातात.

वृत्तानुसार, गोर यांचे नाव अनेक वरिष्ठ पदांसाठी चर्चेत आहे. यामध्ये मार्को रुबियो यांच्या जागी परराष्ट्रमंत्री होणे किंवा सूसी वाइल्स यांच्या जागी व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ पद स्वीकारणे, या पर्यायांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांनी गोर यांना ख्रिस लँडाऊ यांच्या जागी उपपरराष्ट्रमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. प्रशासनात अशी चर्चा आहे की, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो २०२८ किंवा २०३२ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी भविष्यात मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकतात. दुसरीकडे, चीफ ऑफ स्टाफ सूसी वाइल्स आणि उपपरराष्ट्रमंत्री ख्रिस लँडाऊ यांच्या पदांबाबतही विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, लँडाऊ यांनी पद सोडण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

ट्रम्प यांच्या एका सल्लागाराच्या मते, राष्ट्राध्यक्षांना गोर विशेष पसंत आहेत. ट्रम्प सत्तेबाहेर असताना गोर यांनी त्यांच्यासाठी अनेक व्यावसायिक व्यवहार घडवून आणण्यात मदत केली होती. याशिवाय, गोर हे डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचेही अत्यंत जवळचे मानले जातात. दरम्यान, या सर्व चर्चांवर सर्जिओ गोर, परराष्ट्र मंत्रालय आणि व्हाइट हाऊस या तिन्हींकडून स्पष्ट शब्दांत खंडन करण्यात आले आहे. ही बातमी पूर्णपणे निरर्थक असल्याचे सांगत गोर म्हणाले, मला अन्य कोणत्याही पदात किंवा भूमिकेत रस नाही. तसेच, यासंदर्भात मी कोणाशीही चर्चा केलेली नाही. मार्को रुबियो हे सर्वाधिक पात्र परराष्ट्रमंत्री असून ते आपले जवळचे मित्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक जनसंपर्क विभागाचे सहायक सचिव डायलन जॉन्सन आणि व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनीही हे वृत्त निनावी सूत्रांवर आधारित आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. रुबियो आणि वाइल्स आपापल्या पदांवर उत्कृष्ट कामगिरी करत असून गोर यांच्याशी त्यांचे संबंधही अत्यंत चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.अधिकृत पातळीवर या वृत्तांचे खंडन करण्यात आले असले, तरी वॉशिंग्टन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वर्तुळात सर्जिओ गोर यांची वाढती राजनैतिक ओळख आणि ट्रम्प प्रशासनातील त्यांचे वाढते महत्त्व हा चर्चेचा विषय ठरला आहे. सर्जिओ गोर यांनी यापूर्वी व्हाइट हाऊसमधील 'ऑफिस ऑफ प्रेसिडेन्शियल पर्सनल' या विभागात वरिष्ठ पदावर काम केले आहे. या विभागाकडे प्रशासकीय नियुक्त्या आणि उमेदवारांची छाननी करण्याची जबाबदारी होती. ट्रम्प यांच्यापर्यंत असलेली त्यांची थेट पोहोच आणि राष्ट्राध्यक्षांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे प्रशासनातील त्यांचा प्रभाव वाढला आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोर यांनी भारतातील अनेक उच्चस्तरीय राजनैतिक दौरे यशस्वीपणे पार पाडले आहेत. यामध्ये परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो, वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक आणि तत्कालीन लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्या भारत दौऱ्यांचा समावेश आहे.भारतातील अमेरिकेचे राजदूत असण्यासोबतच गोर दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणूनही काम पाहत आहेत. सोव्हिएत संघाच्या काळात उझबेकिस्तानमध्ये जन्मलेल्या गोर यांनी आपल्या पार्श्वभूमीचा आणि प्रादेशिक संपर्कांचा उपयोग मध्य आशियाई देशांसोबत अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी केला आहे. अलीकडेच त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. तसेच अटलांटा येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेत आणि उझबेकिस्तान दौऱ्यातही ते रुबियो यांच्यासोबत दिसले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande