युरोपमध्ये विमानांना बॉम्ब धमक्यांचे सत्र सुरूच; अनेक विमानांचे आपत्कालीन लँडिंग
पॅरिस, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।गुरुवारी युरोपच्या आकाशात मोठी खळबळ उडाली. अनेक प्रवासी विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या खोट्या धमक्या मिळाल्याने त्यांचा मार्ग बदलावा लागला किंवा त्यांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. गेल्या एका आठवड्यात अशा प्रकारची
युरोपमध्ये विमानांना बॉम्ब धमक्यांचे सत्र सुरूच; अनेक विमानांचे आपत्कालीन लँडिंग


पॅरिस, 05 नोव्हेंबर (हिं.स.)।गुरुवारी युरोपच्या आकाशात मोठी खळबळ उडाली. अनेक प्रवासी विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या खोट्या धमक्या मिळाल्याने त्यांचा मार्ग बदलावा लागला किंवा त्यांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. गेल्या एका आठवड्यात अशा प्रकारची ही दुसरी मोठी घटना असून, त्यामुळे युरोपीय देशांच्या सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.

डब्लिनहून रोमकडे जाणारे एअर लिंगसचे ईआय-४०२ हे विमान सुरक्षेच्या कारणास्तव फ्रान्समधील एव्ह्रू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. हे ठिकाण पॅरिसच्या पश्चिमेला सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय, हेलसिंकीहून रोमकडे जाणाऱ्या फिनएअरच्या एका विमानाला इटलीच्या हवाई दलातील लढाऊ विमानांनी सुरक्षा कवच दिले. त्यानंतर हे विमान रोममधील फ्युमिचिनो विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तपासणीनंतर पोलिसांना विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

त्याचप्रमाणे, बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील झाव्हेंटेम विमानतळावर पोलंडच्या 'एलओटी' विमान कंपनीचे विमान उतरवण्यात आले. तपासणीनंतर तेथेही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.दरम्यान, बल्गेरियात तीन विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यापैकी दोन विमाने सोफिया येथे, तर एक विमान प्लोवदिव्ह येथे उतरवण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागकडे जाणाऱ्या चार विमानांनाही बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या धमक्यांमधील संभाव्य धोका कमी असल्याचे मानले.याशिवाय, मिलानहून बुखारेस्टकडे जाणाऱ्या 'विझ एअर'च्या विमानातून सुमारे २०० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. रोमानियाच्या अधिकाऱ्यांनी बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने विमानाची तपासणी केली.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीही किमान सात विमानांना आणि एका क्रूझ जहाजाला अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. सुदैवाने, या सर्व घटनांमध्ये तपासणीनंतर कोणतेही स्फोटक साहित्य आढळले नाही. त्यामुळे या सर्व धमक्या केवळ अफवा पसरवण्यासाठी किंवा भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अद्याप कोणत्याही देशाने किंवा संघटनेने या धमक्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यामागे रशिया आणि इराणशी संबंधित संकरित हल्ले (हायब्रिड अटॅक्स) आणि घातपाताच्या कटांचा हात असण्याची शक्यता युरोपीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.या संशयाला आणखी एक कारण आहे. याच आठवड्यात अज्ञात हॅकर्सनी युरोपातील अनेक देशांमधील सुपरमार्केट्स आणि फ्रान्समधील रक्तपेढ्यांच्या शीतकरण यंत्रणांमध्येही व्यत्यय आणला होता.तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या खोट्या बॉम्बस्फोटाच्या धमक्या आणि सायबर हल्ले हे कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर दहशत आणि गोंधळ निर्माण करण्याच्या सुनियोजित रणनीतीचा भाग असू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande