पिकांच्या आड गांजाची लागवड; जामनेरमध्ये ३.३५ लाखांचा गांजा जप्त
सुमारे १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मुळासकट जप्त, शेतमालक पसार जळगाव, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : शेतातील नियमित पिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार जामनेर तालुक्यातील मालदभाडी शिवारात
पिकांच्या आड गांजाची लागवड; जामनेरमध्ये ३.३५ लाखांचा गांजा जप्त


सुमारे १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मुळासकट जप्त, शेतमालक पसार

जळगाव, ६ नोव्हेंबर (हिं.स.) : शेतातील नियमित पिकांच्या आड गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार जामनेर तालुक्यातील मालदभाडी शिवारात उघडकीस आला आहे. जामनेर पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकून १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मुळासकट जप्त केली. जप्त केलेल्या गांजाची अंदाजित बाजारभावानुसार किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच शेतमालक घटनास्थळावरून पसार झाला.

मालदभाडी गावाच्या हद्दीतील एका शेतात गांजाची लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतावर अचानक छापा टाकला. यावेळी शेतात सात ते आठ फूट उंचीची गांजाची हिरवीगार झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून आली. या झाडांना पाने, फुले आणि बोंडे लागलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून सर्व झाडे मुळासकट उपटून ताब्यात घेतली. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम भरले.

किलोमागे २५ हजार रुपये बाजारभाव; मुद्देमालाची किंमत ३.३५ लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाचा बाजारभाव प्रतिकिलो २५ हजार रुपये गृहीत धरून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या प्रकरणात शेतमालक अनिल दगडू पाटील (रा. मालदभाडी, ता. जामनेर) हा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस पथक शेतात पोहोचताच तो घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले. स्वतःच्या शेतात अंमली पदार्थ असलेल्या कॅनाबिस वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. चोरट्या विक्रीच्या उद्देशाने ही लागवड करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेश विलास लहासे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(ब) आणि २०(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाईनंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे करीत आहेत.

शेतातील नियमित पिकांच्या आड गांजाची लागवड सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मालदभाडी परिसरासह जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande