
वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका बाजूला उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह रिपब्लिकन पक्षातील अनेक नेते ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकी सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवले आहे. हा निकाल ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच, डेमोक्रॅटिक पक्षाकडून ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची पार्श्वभूमी तयार केली जात आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार रॉबर्ट गार्सिया यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्टमधून ट्रम्प यांना सूचक इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ दोन शब्द लिहिले आहेत – 'वकील तयार ठेवा'
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिनिधीगृहाच्या देखरेख समितीचे प्रमुखपद स्वीकारल्यानंतर रॉबर्ट गार्सिया ट्रम्प प्रशासनाच्या विविध विभागांची चौकशी सुरू करणार आहेत. ट्रम्प कुटुंबाचे व्यावसायिक व्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. तसेच जेफ्री एपस्टीन प्रकरणातील कागदपत्रे कथितरीत्या उघड करणे आणि त्यानंतर झालेल्या प्रकरणाच्या कथित दडपशाहीमध्ये व्हाइट हाऊस तसेच न्याय विभागाची भूमिका काय होती, याचीही चौकशी केली जाणार आहे.यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२१ मध्ये महाभियोगाचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र, दोन्ही वेळा ट्रम्प या कारवाईतून बचावले होते.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर आता विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहांमध्ये अल्पमतात जावे लागले आहे.या निवडणूक निकालांचा फटका ट्रम्प यांच्या विधिमंडळातील कामकाजाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही विधेयक मंजूर करून घेणे ट्रम्प यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode