
वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी गुरुवारी ट्रम्प प्रशासनातून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या सर्व प्रसारमाध्यमांतील वृत्तांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर रुबिओ यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत माध्यमांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रुबिओ म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या अखेरपर्यंत त्यांच्यासाठी काम करणे, ही माझी सुरुवातीपासूनची योजना आहे.”ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रुबिओ म्हणाले, “खरे सांगायचे तर, या निराधार बातम्यांना सुरुवात कुठून झाली, हेच मला माहीत नाही.”
यापूर्वी गुरुवारी एका वृत्तात रुबिओ प्रशासन सोडण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, पदाचा राजीनामा देण्याबाबत त्यांनी व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र, त्यांना पदावर कायम राहण्यास सांगण्यात आल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. तथापि, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या वृत्ताचे खंडन केले आहे. जागतिक जनसंपर्क विभागाचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री डिलन जॉन्सन यांनी हे वृत्त पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय, आणखी एका वृत्तात रुबिओ २०२८ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी तयारी करत असल्याचा दावा करण्यात आला होता. हे वृत्तही निराधार आणि खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत थेट विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. “मी सध्या २०२८ बद्दल कोणतीही चर्चा करणार नाही,” असे ते म्हणाले.
यापूर्वी रुबिओ यांनी हेही स्पष्ट केले होते की, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी २०२८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास आपण त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ. रिपब्लिकन पक्षातही व्हान्स यांच्याकडे ट्रम्प यांचे संभाव्य उत्तराधिकारी आणि राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode