
रायगड, 07 नोव्हेंबर (हिं.स.) विवाहविषयक संकेतस्थळावर यूकेमध्ये वास्तव्यास असल्याचे भासवून महिलेशी मैत्री केली. लग्नाचे आमिष दाखवून परदेशातून महागड्या भेटवस्तूंचे पार्सल पाठविल्याचा बनाव रचला आणि कस्टम शुल्कासह विविध कारणांसाठी पैसे उकळत खोपोलीतील एका महिलेची तब्बल ४२ लाख ५९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दोन आरोपींविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोलीतील काटरंग परिसरात राहणाऱ्या महिला फिर्यादी यांचे मराठी मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर प्रोफाइल होते. आरोपी क्रमांक एक याने आपण यूकेमध्ये वास्तव्यास असल्याचे दर्शविणारे बनावट प्रोफाइल तयार करून फिर्यादी यांना मैत्रीची विनंती पाठवली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी संपर्क वाढवून विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर यूकेमधून २० हजार पौंडांसह सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ, हँडबॅग, परफ्यूम, आयफोन १८ प्रो मॅक्स, एअरपॉड्स, चॉकलेट आणि डायमंड ज्वेलरी असे साहित्य दिल्ली विमानतळावर पार्सलद्वारे पाठविल्याचे सांगितले.
यानंतर आरोपी क्रमांक दोन हिने आपण दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागातील अधिकारी असल्याची खोटी ओळख फिर्यादी यांना करून दिली. पार्सल मिळविण्यासाठी विविध शुल्क भरावे लागतील, असे सांगून आरोपींनी फिर्यादींकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. पार्सल चार्जेस, रजिस्ट्रेशन फी, कस्टम ड्युटी, न्यायालयीन परवानगीपत्र, अधिकाऱ्याची सही, न्यायालय व वकील फी तसेच डिक्लेरेशन आणि टॅक्स फी अशा कारणांनी एकूण ४२ लाख ५९ हजार ५०० रुपये पाच वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितले.
पैसे न पाठविल्यास पहिल्या आरोपीला तुरुंगात जावे लागेल, अशी भीतीही फिर्यादी यांना घालण्यात आली. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विविध टप्प्यांत रक्कम पाठविली. मात्र, परदेशातून पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९२/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन हिरे पुढील तपास करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)