
रायगड, 07 नोव्हेंबर (हिं.स.) खोपोलीजवळील विहारी येथील झेनिथ बिर्ला इंडिया लिमिटेड कंपनीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिरातून सुमारे ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे आवरण चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १७ वर्षे २ महिने वयाच्या विधिसंघर्षित बालकाविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहारी बौद्धवाडी येथे राहणारे फिर्यादी झेनिथ बिर्ला इंडिया कंपनीत काम करतात. कंपनीच्या आवारातील तिरुपती बालाजी मंदिराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून संबंधित बालकाने देवाच्या मूर्तीला लावलेले चांदीचे आवरण चोरून नेल्याचा आरोप आहे. या चांदीच्या आवरणाची किंमत ५ लाख २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)