अवैध सावकारीविरोधात सोलापूरमध्ये कारवाई; सावकारावर गुन्हा दाखल
सोलापूर, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील विनापरवाना आणि बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वज्रेश्वर नगर परिसरात छापा टाकून एका अवैध सावकाराच्या घरातून कोरे धनादेश, बॉण्डपेपर आणि इसारा पावत्यांसह सं
अवैध सावकारीविरोधात सोलापूरमध्ये कारवाई; सावकारावर गुन्हा दाखल


सोलापूर, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील विनापरवाना आणि बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वज्रेश्वर नगर परिसरात छापा टाकून एका अवैध सावकाराच्या घरातून कोरे धनादेश, बॉण्डपेपर आणि इसारा पावत्यांसह संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एका सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी दिली.

अंबिका नगर येथील रहिवासी जय लक्ष्मण पतंगे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाने दोन विशेष पथके तयार केली होती. त्यापैकी एका पथकाने कर्णिक नगर-वज्रेश्वर नगर परिसरातील युवराज अशोक जानकर यांच्या घराची झडती घेतली. यावेळी नागरिकांकडून घेतलेले कोरे धनादेश, कोरे बॉण्डपेपर, अनामत ठेव पावत्या, इसारा पावत्या, करारपत्रे, खरेदीखते आणि वाहन खरेदीच्या पावत्यांसह विविध कागदपत्रे आढळून आली.

या प्रकरणी सहकार अधिकारी राजू नरहरी ढोणे यांच्या फिर्यादीवरून युवराज जानकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३९ आणि ४१ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या पथकाने निलेश चंद्रकांत हरे यांच्या घरी केलेल्या तपासणीत कोणतीही बेकायदेशीर कागदपत्रे आढळली नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande