


रायगड, 08 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवणाऱ्या खोपोलीतील तरुण कंटेन्ट क्रिएटर्सनी एकत्र येत यंदा आगळ्यावेगळ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले. भारतीय संस्कृती आणि परंपरेची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला खोपोलीकरांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, भावगीते आणि भक्तिगीतांची सुरेल मैफल रंगली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीताचा आनंद घेत नागरिकांनी दिवाळीचा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थितांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विजेत्यांना सोन्या-चांदीचे दागिने तसेच विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमाचे आयोजन निखिल घोडके, अक्षय गावंडे, आनंद शिंदे, ज्योती भोपी, ज्योती भागेकर, तेजस सपकाळ आणि प्रांजल यादव या युवा कंटेन्ट क्रिएटर्सनी केले होते. सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतूनही तरुण पिढी आपले योगदान देऊ शकते, हे त्यांनी या आयोजनातून दाखवून दिले.
या कार्यक्रमाला खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका श्वेता आहीर, नगरसेवक राहुल गायकवाड, भाजप नेते संजय तन्ना आणि शहराध्यक्ष अजय इंगुळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजक तरुणांचे कौतुक करत त्यांच्या पुढील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)