
रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील अन्नपदार्थांचा साठा जप्त केला असून ३२ नमुने संकलित करण्यात आले आहेत.
नागरिकांना सुरक्षित, निर्भेळ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ, प्रतिबंधित रंगांचा वापर व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या रत्नागिरी विभागातर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मिठाई विक्रेते, खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संशयास्पद अन्नपदार्थ आढळून आल्याने नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान करण्यात आलेली प्रमुख कारवाई अशी - रत्नागिरी शहर : टर्कॉईज रंगाचा काजू रोल – ६ किलो, किंमत १०,३२०/-.
दापोली : म्हैसूर पाक – १० किलो व मलाई बर्फी – १३ किलो, एकूण किंमत ११,५२०/-.
रत्नागिरी शहर : खवा – १८ किलो व सुटे खाद्यतेल – १० किलो, एकूण किंमत ७,८८०/-.
रत्नागिरी ग्रामीण : शेवचिवडा – ५० किलो व मिश्रण फरसाण – ७० किलो, एकूण किंमत २५,२००/-.
बेसन – १०० किलो, ओम नमकीन फरसाण – ३० किलो व मैदा – १०० किलो, एकूण किंमत १९,३२०/-.
कोकम आगळ – २०४ लिटर, किंमत ५३,०४०/-.
नोंदविलेल्या सर्व सहा नोंदींची एकत्रित दर्शनी किंमत १,२७,२८० रुपये आहे.
संकलित अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, प्राप्त होणाऱ्या विश्लेषण अहवालानुसार संबंधित अन्न व्यावसायिकांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ तयार करताना व विक्री करताना स्वच्छता, गुणवत्ता व सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करावे. मिठाई व इतर खाद्यपदार्थांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर करू नये. तसेच नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, उत्पादन तारीख व अंतिम वापर तारीख यांची खात्री करावी.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे अन्न व औषध प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही विशेष तपासणी व कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी