
रायगड, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये प्रस्तावित टोरंट पॉवरसह विविध ऊर्जा प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थी व युवा नेते विवेकानंद पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका मांडली. ‘पुन्हा सह्याद्रीच्या दिशेने आलात तर तुम्हाला सह्याद्रीत गडप केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली हजारो वर्षे उभी असलेली झाडे तोडण्यास आमचा शंभर टक्के विरोध आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सह्याद्रीच्या परिसरात टोरंट कंपनीसह विविध उद्योगसमूहांचे २३ ते २४ प्रकल्प प्रस्तावित असून, यामुळे संपूर्ण डोंगररांगांची पर्यावरणीय हानी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
सह्याद्री हा जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. भीमाशंकर परिसरातील महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू याच्या अधिवासावरही या प्रकल्पांमुळे संकट निर्माण होऊ शकते. जंगलच नष्ट झाले तर शेकरूचे अस्तित्व कसे टिकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच डोंगरांमध्ये खोलवर ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग केल्यास भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. इरशाळवाडी आणि माळीण दुर्घटनांचा संदर्भ देत त्यांनी संभाव्य धोक्यांबाबत सरकारला सावध केले.
सरकारच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जुनी आणि मोठी झाडे तोडून त्याऐवजी लहान रोपे लावण्याचे समर्थन करता येणार नाही. २०१६ मधील वृक्षलागवडीचा हिशेब सरकारने आधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जंगलावर आदिवासींचे हक्क असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम करणारे प्रकल्प सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. सह्याद्री आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप यांच्यासह शेकडो नागरिक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)