स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक
रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । केंद्र सरकारच्या ''स्वच्छ सर्वेक्षण २०२६'' या मोहिमेत रत्नागिरी नगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला. शहराचे विलोभनीय सौंदर्य, कचरा व्यवस्थापनाचे सुसूत्र नियोजन आणि रत्नागिरीकरांची स्वच्छतेविषय
स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक


रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' या मोहिमेत रत्नागिरी नगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला.

शहराचे विलोभनीय सौंदर्य, कचरा व्यवस्थापनाचे सुसूत्र नियोजन आणि रत्नागिरीकरांची स्वच्छतेविषयीची कटिबद्धता याच्या बळावर नगरपालिकेने राज्यपातळीवर हा मानाचा तुरा रोवला आहे.

या घवघवीत यशाबद्दल ११ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगरपालिकेचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरीचा हा सर्वोच्च सन्मान स्वीकारण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपाध्यक्ष समीर तिवरेकर आणि मुख्याधिकारी वैभव गारवे नवी दिल्लीत जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेने शहरात राबवलेली धडक स्वच्छता अभियाने, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे केलेले प्रभावी नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट यामुळेच हे यश संपादन करता आले आहे. या संपूर्ण प्रवासात रत्नागिरीतील सुजाण आणि जागरूक नागरिकांनी दिलेली मोलाची साथ अत्यंत निर्णायक ठरली आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande