
नवी दिल्ली/ह्यूस्टन, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची पूर्ण मालकीची उपकंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया (कॅलिफोर्निया) ने टेक्सासमधील फ्रिस्को येथे आपली नवीन शाखा सुरू केली आहे.
स्टेट बँकेने रविवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. या शाखेचे उद्घाटन एसबीआय समूहाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. टेक्सासमध्ये नवीन शाखा सुरू झाल्यामुळे अमेरिकेत एसबीआयच्या कॅलिफोर्निया उपकंपनीची एकूण आठ केंद्रे झाली आहेत. या उद्घाटनप्रसंगी ह्यूस्टन येथील भारताचे महावाणिज्यदूत डी. सी. मंजुनाथ आणि फ्रिस्कोचे महापौर मार्क हिल उपस्थित होते.
बँकेच्या माहितीनुसार, या शाखेच्या उद्घाटनामुळे एसबीआयच्या या उपकंपनीने कॅलिफोर्नियाबाहेर प्रथमच प्रत्यक्ष विस्तार केला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत या उपकंपनीच्या आठ ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत.
स्टेट बँकेने सांगितले की, वेगाने विकसित होत असलेल्या उत्तर डॅलस परिसरातील फ्रिस्को येथे सुरू करण्यात आलेली ही नवीन शाखा किरकोळ आणि व्यावसायिक बँकिंग सेवांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक ठेवी, व्यावसायिक कर्जे तसेच आंतरराष्ट्रीय पैशांचे हस्तांतरण या सेवांचा समावेश आहे. उत्तर टेक्सासमधील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आणि कंपन्यांच्या गरजा लक्षात घेऊन या सेवा तयार करण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी मंजुनाथ यांनी भारत-अमेरिका आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच उत्तर टेक्सासमध्ये वेगाने वाढणाऱ्या भारतीय स्थलांतरित समुदायासाठी आर्थिक संपर्क वाढविण्यात या शाखेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे, कॅलिफोर्नियातील उपकंपनीच्या आठ केंद्रांव्यतिरिक्त एसबीआयची अमेरिकेत स्वतंत्र उपस्थितीही मजबूत आहे. बँकेच्या न्यूयॉर्क, शिकागो आणि लॉस एंजेलिस येथे पूर्ण सेवा देणाऱ्या शाखा असून वॉशिंग्टनमध्ये प्रतिनिधी कार्यालयही कार्यरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule