
नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्त परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या मुहूर्त ट्रेडिंग सत्राचा समारोप आज किरकोळ घसरणीसह झाला. एक तासाच्या या विशेष व्यवहारादरम्यान शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. अखेर विक्रीचा दबाव वाढल्याने बाजारातील घसरणीचे पारडे जड ठरले. आजच्या व्यवहाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली होती; मात्र विक्रीच्या दबावामुळे ही तेजी अखेरपर्यंत टिकू शकली नाही.
बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या समभागांमध्ये उच्च स्तरावर झालेली नफा वसुली आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला सुरुवातीची तेजी कायम राखता आली नाही. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण होऊनही व्यापक बाजारात लहान आणि मध्यम कंपन्यांच्या समभागांबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला. या संवत्सरातील पहिल्या विशेष एक तासाच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ०.०४ टक्के, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी ०.१८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
आज दुपारी मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष सत्रासाठी सुरू झालेल्या बीएसईच्या सेन्सेक्सने २७१.३२ अंक म्हणजेच ०.३३ टक्क्यांच्या तेजीसह ८१,२९९.३४ अंकांवर व्यवहाराची सुरुवात केली. बाजार सुरू होताच औषधनिर्माण आणि धातू क्षेत्रातील निवडक बड्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याने हा निर्देशांक ४१४.०९ अंक म्हणजेच ०.५१ टक्क्यांनी वधारून ८१,४४२.११ अंकांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही.
सेन्सेक्स उच्चांकी स्तरावर पोहोचल्यानंतर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी बँकिंग व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये नफा वसुली सुरू केली. त्यामुळे निर्देशांक उच्चांकी स्तरावरून खाली घसरला. सातत्याने झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकी स्तरावरून ५०९.६९ अंकांनी घसरून ९५.६० अंक म्हणजेच ०.१२ टक्क्यांच्या घसरणीसह ८०,९३२.४२ अंकांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला. अखेरीस समारोपाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी स्तरावरून ६६.९८ अंकांची किरकोळ सुधारणा केली आणि २८.६२ अंक म्हणजेच ०.०४ टक्क्यांच्या घसरणीसह ८०,९९९.४० अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आजच्या विशेष मुहूर्त सत्राची सुरुवात ४०.१० अंक म्हणजेच ०.१६ टक्क्यांच्या तेजीसह २५,०७०.४५ अंकांवर केली. बाजार सुरू होताच औषधनिर्माण आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी झाल्याने निफ्टीने १०१.५० अंक म्हणजेच ०.४१ टक्क्यांची वाढ नोंदवत २५,१३१.८५ अंकांचा उच्चांकी स्तर गाठला. त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि निर्देशांक घसरू लागला. व्यवहारांच्या अखेरीस नफा वसुली आणि मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे निफ्टीने आपली संपूर्ण सुरुवातीची तेजी गमावली. दिवसाच्या उच्चांकी स्तरावरून हा निर्देशांक १४५.४५ अंकांनी घसरून ४५.०५ अंक म्हणजेच ०.१७८ टक्क्यांच्या घसरणीसह २४,९८५.३० अंकांपर्यंत खाली आला. संपूर्ण सत्रातील व्यवहारानंतर निफ्टी ४३.९५ अंक म्हणजेच ०.१८ टक्क्यांच्या घसरणीसह २४,९८६.४० अंकांवर बंद झाला.
आजच्या एक तासाच्या विशेष व्यवहारादरम्यान विविध क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला. निफ्टी प्रसारमाध्यम निर्देशांकाने १.७९ टक्क्यांची मोठी झेप घेत आघाडी पटकावली. त्याचबरोबर आरोग्य सेवा क्षेत्रातील समभागांनाही गुंतवणूकदारांची पसंती मिळाली. त्यामुळे निफ्टी औषधनिर्माण निर्देशांक १.७४ टक्के आणि निफ्टी धातू निर्देशांक १.१५ टक्क्यांच्या चांगल्या तेजीसह बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ०.३३ टक्के आणि सरकारी बँकांचा निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ०.३२ टक्क्यांच्या घसरणीसह लाल निशाणावर बंद झाले.
शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीच्या तुलनेत व्यापक बाजाराने मात्र चांगली लवचिकता दाखवली. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.९४ टक्क्यांच्या जोरदार तेजीसह बंद झाला. तर निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकानेही ०.१३ टक्क्यांची वाढ नोंदवली. व्यापक बाजारातील या तेजीमुळे छोट्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य घसरण्याऐवजी बहुतांश प्रमाणात टिकून राहिले.
आजच्या मुहूर्त सत्रातील बीएसईच्या वाढ-घट आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण होऊनही बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहारादरम्यान बीएसईवर एकूण ४,२३७ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार झाले. त्यापैकी ३,१३६ समभाग तेजीसह बंद झाले, तर ९१३ समभागांमध्ये घसरण झाली. १८८ समभागांच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
एनएसईवर आज ३,२२८ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार झाले. त्यापैकी २,५९७ समभाग नफ्यासह हिरव्या निशाणावर, तर ६३१ समभाग तोट्यासह लाल निशाणावर बंद झाले. त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० समभागांपैकी १४ समभाग तेजीसह, १४ समभाग घसरणीसह, तर दोन समभाग कोणताही बदल न होता बंद झाले. निफ्टीमधील ५० समभागांपैकी १७ समभाग हिरव्या निशाणावर, ३२ समभाग लाल निशाणावर, तर एका समभागात कोणताही बदल झाला नाही.
दिवाळीच्या या विशेष सत्रानंतर राष्ट्रीय शेअर बाजारात सन फार्मास्युटिकल्सचा समभाग २.९६ टक्क्यांच्या जोरदार तेजीसह १,९१५ रुपयांवर बंद झाला. त्यामुळे तो आजच्या सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या समभागांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर टाटा स्टीलचा समभाग २.०९ टक्क्यांनी वधारून १९०.२० रुपये, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) १.३१ टक्क्यांच्या वाढीसह २३४.८० रुपये, टीएमपीव्ही १.१३ टक्क्यांच्या तेजीसह २९५.३० रुपये आणि अदाणी पोर्ट्सचा समभाग ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह १,९४९.३० रुपयांवर बंद झाला. हे पाच समभाग आजच्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या समभागांच्या यादीत होते.
दुसरीकडे, घसरणीचा सामना करणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एसबीआय लाइफ इन्शुरन्सचा समभाग १.११ टक्क्यांनी घसरून १,७६४.२० रुपयांवर बंद झाला. त्यामुळे तो आज सर्वाधिक घसरण नोंदवणारा समभाग ठरला. याशिवाय इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) १.०७ टक्क्यांनी घसरून ५,४१७.३० रुपये, भारती एअरटेल १.०३ टक्क्यांनी घसरून २,०८५.५० रुपये, मॅक्स हेल्थकेअर ०.८६ टक्क्यांच्या घसरणीसह ९२६ रुपये आणि ट्रेंट लिमिटेडचा समभाग ०.७० टक्क्यांनी घसरून ३,०५७.५० रुपयांवर बंद झाला. या पाच कंपन्यांचे समभाग आज सर्वाधिक घसरण नोंदवणाऱ्या समभागांच्या यादीत समाविष्ट होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule