
– साप्ताहिक कमोडिटी बाजाराचा आढावा
नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये २ ते ६ नोव्हेंबरदरम्यानचा व्यापारी आठवडा कमोडिटी बाजारासाठी मोठ्या घडामोडींचा ठरला. आंतरराष्ट्रीय बाजार (कमोडिटी एक्स्चेंज इन्कॉर्पोरेटेड – कॉमेक्स) आणि देशांतर्गत कमोडिटी बाजार (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज – एमसीएक्स) येथे मागील व्यापारी आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमतींमध्ये जोरदार घसरण झाली. याशिवाय मूलभूत धातूंच्या विभागात ॲल्युमिनियमची वाटचाल मंद राहिली.
मध्य आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघण्याची वाढती शक्यता आणि भू-राजकीय अनिश्चिततेत झालेली घट यामुळे या आठवड्यात जागतिक ऊर्जा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत साप्ताहिक आधारावर सुमारे २० टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली.
मध्य आशियातील वादावर तोडगा निघण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या दोन्ही जागतिक मानक दरांमध्ये घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या महत्त्वपूर्ण पातळीखाली घसरून ९५.३२ डॉलरवर आला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडच्या दरातही एका रात्रीत ८ टक्क्यांहून अधिक दैनिक घसरण होऊन तो प्रति बॅरल ८८.०५ डॉलरवर पोहोचला. भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात आंतरराष्ट्रीय बाजारातून करतो. त्यामुळे तेलाच्या किमतीत झालेल्या या मोठ्या घसरणीचा देशांतर्गत कमोडिटी बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.
याउलट सराफा बाजारात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सणासुदीच्या मागणीमुळे सोने आणि चांदीच्या प्रत्यक्ष खरेदीत मोठी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे कमोडिटी एक्स्चेंजवर २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३९ हजार ३८० ते १ लाख ३९ हजार ५३० रुपयांच्या उच्च पातळीवर व्यवहार करून बंद झाला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मजबुती कायम राहिली. मात्र, आठवड्याच्या मध्यात दबाव निर्माण झाल्यामुळे या चमकदार धातूचा दर दिल्ली सराफा बाजारात प्रति किलो १ लाख ९९ हजार ९०० रुपयांच्या जुन्या विक्रमी पातळीवर टिकून राहिला.
दुसरीकडे, मूलभूत धातूंच्या विभागात चीनमधील मंदावलेली मागणी आणि उत्पादन क्षेत्रातील संथ गतीमुळे तांब्यासह ॲल्युमिनियमच्या किमतींमध्येही या आठवड्यात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ॲल्युमिनियमच्या साठ्यात होत असलेल्या वाढीचा देशांतर्गत प्रत्यक्ष बाजारभावावर सातत्याने दबाव राहिला. त्यामुळे धातू क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी वाढलेल्या किमतींच्या पातळीवर व्यवहार करताना सावध भूमिका घेतली.
कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर निर्देशांक १०१.९० च्या पातळीवर मजबूत झालेला असतानाही सोन्याची सुरक्षित गुंतवणुकीची मागणी (सेफ हेवन डिमांड) कमी झालेली नाही. मध्य आशियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कमोडिटी एक्स्चेंजवरील आपली खरेदीची भूमिका (लाँग पोझिशन) कायम ठेवली आहे. यासोबतच देशांतर्गत प्रत्यक्ष बाजारात लवकरच सुरू होणारा लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता, सराफांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३९ हजार रुपयांच्या वर स्थिर राहिले आहेत.
कॅपेक्स गोल्ड अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव दत्ता यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि ॲल्युमिनियम व तांब्यासारख्या औद्योगिक धातूंमधील मंदीमुळे आगामी काळात उत्पादन क्षेत्राचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. दीर्घकालीन दृष्टीने ही परिस्थिती कमोडिटी बाजारातील वातावरणाला नवा आधार देऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule